दौंड(पुणे) - तालुक्यातील कानगाव येथे पैशाचे आमिष दाखवून एका ११ वर्षीय मुलीवर तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. घरी कोण नसल्याचा फायदा घेत तरुणाने अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला .याबाबत १७ मार्चला गुन्हा दाखल झाला आहे. या आरोपीस अटक केल्याची माहिती पाटस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली. मयूर फडके असे त्या आरोपीचे नाव आहे.
काय आहे प्रकरण?
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपीसोबत बोलत असल्याचे पालकांनी पाहिले. यावेळी पालकांनी सदर मुलीस तो मुलगा काय म्हणत होता याबाबत विचारणा केली. त्यावेळी सदर मुलीने पालकांना सांगितले की तो म्हणत होता आपण अगोदर केले होते तसे आता होईल का? यावेळी पालकांनी सदर मुलीस काय केले होते याबाबत विचारणा केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणातील आरोपी मयूर फडके हा 10 -20 रुपये देण्याचे आमिष दाखवून सदर पीडितेवर लैंगिक अत्याचार करत होता. गेले वर्षभर हा प्रकार सुरू होता. पीडितेच्या पालकांनी पाटस पोलीस स्टेशनला येऊन सदर प्रकाराबाबत तक्रार दिली.
आरोपीस 4 दिवसांची पोलीस कोठडी :
पाटस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी तत्काळ आरोपी मयूर फडके यास ताब्यास घेतले. सदर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी आरोपी मयूर फडके यास दिली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली.