पुणे - पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर एका भरधाव ट्रॅव्हल्स बसने एका बंद पडलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी आहेत. दरम्यान, एका पोलीस व्हॅनचा देखील अपघात झाला असून यात सुदैवाने कोणीही जखमी नाही. या दोन्ही घटना ओझर्डे गावाच्या हद्दीत घडल्या आहेत. बस आणि कंटेनरचा अपघात पहाटे साडेपाचच्या सुमारास तर, पोलीस व्हॅनचा अपघात सकाळी सव्वा नऊच्या सुमारास झाला आहे. बसच्या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव रमेश संजय कबाडे (२४) असे असून तो सोलापूरचा असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर ट्रॅव्हल बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. त्यावेळी ओझर्डे गावाच्या हद्दीत लेन क्रमांक १ वर एक कंटेनर बंद पडलेल्या अवस्थेत महामार्गावर थांबला होता. त्याला भरधाव वेगात येणाऱ्या बसने पाठीमागून जोरात धडक दिली. या भीषण अपघातात १ जण ठार झाला तर ५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - बारामतीत प्रलंबीत मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेचे धरणे आंदोलन
तर, दुसऱ्या घटनेत मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा टायर फुटून अपघात झाला आहे. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. सदर व्हॅनमध्ये ४ पोलीस कर्मचारी होते अशी माहिती मिळत आहे.
हेही वाचा - शिरूर तालुक्यातील राऊतवाडीत मेढ्यांच्या कळपावर बिबट्याचा हल्ला