पुणे : अर्ज मागे घे आणि पुणे सोडून जा, अशा धमक्या येत असल्याचा दावा अभिजीत बिचुकले यांनी केला आहे. फोनवरून या धमक्या आल्यानंतर बिचुकले यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून त्याबाबतची तक्रार केली आहे. तसेच आपल्याला तातडीने संरक्षण देण्याचे आदेश संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्याची मागणीही केली आहे. अभिजीत बिचुकले हे प्रत्येक विधानसभा निवडणुकीत उभे असतात. मागच्यावेळी ते वरळीतून उभे होते. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती.
खोटे आरोप होत आहेत : मी आजपर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. त्याचबरोबर मागच्या विधानसभा निवडणुकीत थेट आदित्य ठाकरे यांच्या विरोधात देखील निवडणूक लढवली. पण मला कधीही धमकी आली नाही. काल उमेदवारी अर्ज भरला, त्यानंतर आज थेट धमकीचा कॉल आल्याने मी आयोगाला पत्र लिहिले आहे, असे बीचुकले म्हणाले. तसेच मी आजपर्यंत कोणत्याही जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही. जे माझ्यावर आरोप होत आहे, ते खोटे आरोप होत आहेत. अभिजीत बीचुकले यांना जेव्हा लहुजी छावा संघटनेचे अध्यक्ष सचिन इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवर विचारले असता, त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी शिवीगाळ केली.
बिचुकले इंगळे वाद : बिचूकले यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी अनेक नागरिक येतात. त्याचवेळी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात लहुजी छावा संघटनेचे अध्यक्ष सचिन इंगळे हे आले असता त्यांची आणि अभिजीत बिचुकले यांची यावेळी भेट झाली. त्यावेळेस इंगळे यांनी फोटो काढण्यासाठी अभिजीत बिचुकले यांना विनंती केली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आल्याने त्यांच्या गळ्यामध्ये लहुजी छावा संघटनेचा रुमाल होता. त्याचवेळेस बिचुकले यांनी माझ्यासोबत फोटो काढायचा असेल, तर हा रुमाल काढून ठेवावा, असे सांगितले. त्यावेळेस सचिन इंगळे याने माझ्या समाजाचा मला अभिमान आहे. मी रुमाल काढू शकत नाही, तुम्ही जा तुमच्यासारखे हजार बिचुकले बघितलेत असे म्हटले. त्यावरूनच दोघांमध्ये वाद झाला.
गुन्हा दाखल करण्याची मागणी : अभिजित बिचुकले याने जाहीररित्या पत्रकार परिषद घेऊन मांग आणि महार या दोन जातिमध्ये तेढ व्हावी, असे जाहीर वक्तव्य केले आहे. त्याने माझ्या गळ्यातील लहुजी वस्ताद यांच्या नावाचे पिवळे उपरणे काढून टाका. मगच माझ्या जवळ या, असे सांगत माझा तसेच दलित मातंग समाजाचा अपमान केला आहे. त्याच्यावर अनुसूचित जाति जमाती प्रतिबंधक अॅट्रोसिटी अॅक्ट (१९८९) च्या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार लहुजी शक्ती सेनेच्या वतीने स्वारगेट पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे.