पुणे - कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या आपल्या 33 वर्षीय लेकीला त्या माऊलीने जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल केले. ससून रुग्णालयातून २९ ऑगस्टला याठिकाणी दाखल झालेल्या महिलेवर उपचार सुरू असल्याचे कोविड सेंटरतर्फे सुरुवातीला सांगण्यात आले. मात्र, बरी झालेल्या आपल्या लेकीला जम्बो कोविड सेंटरमधून घरी घेऊन जाण्यासाठी गेलेल्या मातेला, 'तुमची मुलगी येथे दाखलच नव्हती', अशी धक्कादायक माहिती देण्यात आल्याने त्या माऊलीने आता आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे.
जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेल्या प्रिया गायकवाड या३३ वर्षीय महिलेचा घातपात झाला असण्याची शक्यता बेपत्ता महिलेच्या आई आई रागिणी सुरेंद्र गमरे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी जम्बो कोविड सेंटरसमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या उपोषण आंदोलनाचे आयोजन रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले असून यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्ष नेते राहुल डंबाळे हेदेखील उपोषणाला बसलेले आहेत.
यावेळी बोलताना प्रिया गायकवाड यांच्या आई रागिणी सुरेंद्र गमरे म्हणाल्या, माझी मुलगी परत मिळाल्याशिवाय मी हे उपोषण सोडणार नाही. माझी मुलगी मला जीवंतच मिळाली पाहिजे. ससून रुग्णालयातून रुग्णवाहिकेतून कोविड सेंटरमध्ये माझी मुलगी दाखल झाली होती. दरम्यानच्या काळात तिच्यावर उपचार सुरू असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. आता मुलीला घरी परत नेण्याची वेळ आली तेव्हा ती कोविड सेंटरमध्ये नसल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात संबंधित सर्व यंत्रणा हातवर करून मोकळ्या झाल्या आहेत. मला माझी मुलगी परत पाहिजे आणि मला न्याय मिळालं पाहिजे, असे रागिणी गमरे म्हणाल्या.
यावेळी बोलताना राहुल डंबाळे म्हणाले, करोडो रुपये खर्च करून आणि ठिकठिकाणी सीसीटिव्ही लावून उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरचा कारभार फारच संतापजनक आहे. अशा प्रकारे याठिकाणाहुन एखादी व्यक्ती बेपत्ता होते, हा यंत्रणेतील दोष असून संबंधित प्रशासकीय यंत्रणेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच पालकमंत्री, आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री या सगळ्यांनी या प्रकारात लक्ष घालून या माऊलीला न्याय द्यावा, अशी आमची मागणी आहे.
त्या महिलेला 5 सप्टेंबरला डिस्चार्ज देण्यात आला - अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल
जम्बो कोविड केअर सेंटरमधून महिला बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाची माहिती घेण्यात येत आहे. लाईफलाईन संस्थेकडे या ठिकाणाचा कारभार असताना हा प्रकार घडला आहे. उपलब्ध माहितीनुसार या महिलेला 5 सप्टेंबरला डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली आहे. जम्बो प्रशासनाच्या माहितीनुसार बेपत्ता प्रिया गायकवाड हिला 5 सप्टेंबरला डिस्चार्ज देण्यात आला आहे. २९ ऑगस्ट ला दाखल केल्यानंतर पाच सप्टेंबरला डिस्चार्ज कसा मिळाला, जर डिस्चार्ज दिला गेला तर त्या महिलेच्या नातेवाईकांना सांगितलं न्हवतं का, ५ सप्टेंबरपासून ती महिला आहे तरी कुठे, असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. तर, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा जम्बोतील बेफिकिरी कारभार समोर आलेला आहे.
हेही वाचा - पुण्याच्या सहकारनगरमधील बंगल्यात आढळला 90 वर्ष आईसह मुलाचा मृतदेह