पुणे - खराडी परिसरातील एका दर्ग्यात एक दोन महिन्यांची मुलगी बेवारस अवस्थेत आढळली. आई-वडीलांनीच या चिमुरडीला दर्ग्यात सोडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. उघड्यावर बाळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या मुलीला ताब्यात घेतले. दामिनी पथकाच्या महिला पोलिसांनी मुलीला पोलीस ठाण्यात आणून बाटलीतील दूध पाजले.
बाळाच्या आई-वडीलांचा शोध सुरू -
सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास खराडीतील दर्ग्यामध्ये एक बाळ रडत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी आसपास पाहिले असता तिच्याजवळ कुणीही नव्हते. नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर दामिनी पथकाच्या महिला पोलीस कर्मचारी उज्ज्वला बनकर आणि सुवर्णा वाळके यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन या बाळाला ताब्यात घेतले. हे बाळ दोन महिन्यांची मुलगी आहे. पोलिसांनी त्यामुलीला ठाण्यात आणून तिची देखभाल केली. बाळाला सोडून देणाऱ्या आई-वडीलांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
काही दिवसांपूर्वी पुण्याच्या कात्रज घाटातही दोन दिवसांच्या बाळाला अज्ञात व्यक्तीने रस्त्याच्या कडेला साठलेल्या कचऱ्यात टाकले होते. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी या बाळाला ताब्यात घेऊन त्याला रुग्णालयात दाखल केले होते. त्या बाळाच्या आई-वडिलांचा अद्याप शोध लागलेला नाही.