पुणे - शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथे 5 दिवसांपूर्वी वयोवृद्ध दांपत्याच्या घरात घडलेल्या चोरीच्या घटनेचा पोलिसांनी तपास लावला आहे. या प्रकरणी एका चोराला अटक करण्यात आली आहे.
पाच दिवसांपूर्वी कवठे येमाई येथे नूर मोहम्मद पठाण यांच्यासह इतर तीन जणांच्या घरी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. रात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करून कपाटातील दागिने व रोख रक्कम चोरी केली होती. ऐन दिवाळीमध्ये झालेल्या या चोरीच्या घटनेचा गांभीर्याने तपास सुरु करण्यात आला होता.
दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारावर शिरूर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्रवीण काळे (वय २१) असे आरोपीचे नाव आहे. चौकशी दरम्यान त्याने पाच ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
हेही वाचा - धक्कादायक...दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
गेल्या अनेक दिवसांपासून शिरूर तालुक्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. या घटनांमध्ये तरूण वयोगटातील मुलांचा सहभाग असल्याचे दिसत आहे. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊनही चोरांना पकडण्यात अपयश येत आहे. आरोपी मोकाट फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, कवठे येमाई येथील चोरी प्रकरणाचा छडा लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.