बारामती - देशात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वारंवार वाढ होत आहे. यातही अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण जास्त आहे. आताही अशीच एक घटना समोर आली आहे. नऊ वर्षीय बालिकेवर सावत्र बापाने अत्याचार केल्याची घटना बारामती तालुक्यातील मोरगाव येथील शेराचीवाडी येथे घडली. याप्रकरणी पीडित बालिकेच्या आईने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपीवर बाललैंगिक अत्याचार व ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ६ ऑक्टोबर रोजी घडली. पीडितेच्या आईशी आरोपीने दुसरे लग्न केलेले आहे. आरोपीने पीडित बालिकेवर अत्याचार केल्यानंतर याबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुभाष मुंडे, पोलीस हवालदार संजय मोहिते यांनी सावत्र बापाला अटक केली आहे.