दौंड ( पुणे ) - तालुक्यातील यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हे तीनही अपघात रविवारी रात्रीच्या सुमारास झाले. चालकांची बेफिकीरी, पाऊस आणि खड्डे यामुळे हे अपघात झाले, असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पहिल्या घटनेत, वाखारी येथील समाधान हॉटेलसमोरील महामार्गावरून जाणाऱ्या एका युवकास अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
दुसऱ्या घटनेत, कासुर्डी येथील शेरू ढाबा येथे एक कंटेनर चालकाने आपले वाहन बेफिरीने भररस्तातच उभे केले होते. त्या कंटेनरला भरधाव कारने मागून धडक दिली. यात कारमधील ५ जणांचा मृत्यू झाला.
तिसरी घटना, सहजपूर गावाच्या हद्दीत घडली. अपघात झाला त्या ठिकाणी रस्त्यावर एक मोठा खड्डा पडलेला आहे. या खड्ड्यात गॅसवाहक कंटेनरचे पुढील चाक रुतले त्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि कंटेनर दुभाजक ओलांडूनविरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेला. तेव्हा समोरून येणाऱ्या दोन कार त्याला धडकल्या. यात एकाचा जागीच तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला.
रात्रीच्या सुमारास झालेल्या या तीनही अपघातांची माहिती मिळताच, यवत पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. त्याआधी, रात्रीची वेळ असल्याने तसेच पावसाचा जोर असल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
हेही वाचा - '...असे मी म्हणलोच नाही,' गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कानावर हात
हेही वाचा - बिबट्याचा पाळीव श्वानावर हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद