पुणे - पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी झालेल्या मतदानामध्ये ४९. ८४ टक्के इतके मतदान झाले आहे. त्यामुळे ५० टक्के पुणेकरांनी मतदानच केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील मतदारांनी मतदानाबाबत उत्साह दाखवला नसल्याचे दिसून आले आहे.
एकंदरीतच उमेदवारी घोषित झाल्यापासूनच पुण्यातील निवडणुकीची हवा निघून गेल्याचे चित्र दिसत होते. तर मतदानाच्या दिवसापर्यंत ते कायम राहिल्याचे मतदानाच्या टक्केवारीतून स्पष्ट होत आहे. मतदारसंघनिहाय विचार केला तर सर्वात जास्त मतदान हे कसबा विधानसभा मतदारसंघात झाले आहे. तर सर्वात कमी मतदान वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात झाले आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात - ४९.८४ टक्के मतदान झाले आहे, मतदान केलेल्या मतदात्यांची संख्या ही १० लाख ३४ हजार १५४ इतकी आहे.
- वडगाव शेरी - ४६.४१ टक्के.
- शिवाजीनगर - ४६.९४ टक्के
- पुणे कॅन्टोमेंट - ४८.७९ टक्के
- पर्वती - ५२.०७ टक्के.
- कोथरुड - ५०.२६ टक्के
- कसबा - ५५.८८ टक्के
पुणे लोकसभेसाठी कमी टक्केवारी होण्याची कारणे अनेक दिली जातात. पुण्यात निवडणुकीत जेवढा प्रचार व्हायला पाहिजे होता तेवढा झाला नाही. उमेदवार मतदारपर्यंत पोहोचण्यास कमी पडले. उन्हामुळे मतदार घराबाहेर पडला नाही. पक्ष, उमेदवार, प्रचारात लोकांपर्यंत पोहोचले नाहीत. या निवडणुकीत पुण्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होती. प्रचारात कोणत्या मोठ्या सभा, रॅली नेते फिरकलेच नाहीत. त्यामुळे येथील लढत तुल्यबळ नव्हती. स्पर्धा नसल्याने मतदारामध्ये निरुत्साह दिसला. तर पुण्याला लागून असलेल्या बारामती लोकसभेत ६० टक्क्याहून अधिक मतदान झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे कमी मतदानाचा फायदा कोणाला होणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी १८ लाख ६ हजार ९५३ मतदारांपैकी ९ लाख ९३ हजार २७८ मतदारांनी अर्थात ५४.११ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यंदा मतदारांची संख्या २० लाख ७४ हजार ८६१ पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी १० लाख ३४ हजार १५४ मतदान झाले आहे. अर्थात ४९.८५ टक्के मतदारांनी हक्क बजावला आहे. पुण्यात या निवडणुकीत झालेल्या मतदानाचा विचार करता हे मतदान कोणाला फायदेशीर आहे, याचे अंदाज बांधले जात आहेत.
गिरीश बापट ज्या विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येतात. त्या कसबा विधानसभा मतदार संघात सर्वात जास्त मतदान झाले आहे. त्यामुळे एकंदरीतच वेगवेगळे अंदाज आता बांधले जात असून भाजपचे गिरीश बापट निवडून येण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे. मात्र, संपुर्ण प्रचार काळात आणि मतदानाच्या दिवशीही आपले इरादे स्पष्ट होऊ न दिलेल्या पुणेकरांच्या मनात नेमके काय आहे, ते २३ मे लाच स्पष्ट होईल.