पुणे - कारमधून गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणी व अमलीपदार्थ विरोधी पथकाने पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी (१७ सप्टेंबर) सायंकाळी येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात करण्यात आली. आरोपींकडून १३० किलो गांजा, कार आणि रोख रक्कम असा एकूण २४ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
अरुण बळीराम जाधव (वय २६, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, निगडी), प्रशांत हरिभाऊ शिंदे (वय २५, निगडी) आणि शुभम सुनील मोहिते (वय १९, रा. पांगरी, खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाचे (पश्चिम) अधिकारी आणि कर्मचारी गुरुवारी (१७ सप्टेंबर) सायंकाळी शहरात गस्त घालत होते. त्यावेळी एका कारमधून गांजाची तस्करी केली जात असून संबंधित कार गुरुवारी सायंकाळी येरवडा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी येरवड्यातील शास्त्रीनगर चौकामध्ये सापळा रचून आरोपींना अटक केली. आरोपींविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- कोरोनाबाधित पतीच्या मृत्यूनंतर खचलेल्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या