पुणे - पुरंदर किल्ल्यावर सिमेंट मिक्सर ग्राईंडर घेऊन जात असताना ३० ते ४० फूट खोल खाली कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू तर, दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (१८ एप्रिल) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
आनंद कंपनी (वय २०), अनिल ब्रिजनंदन पनिका (वय २०) आणि मोनो रमेश बैगा (वय २१) असे मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर राजकुमार रामकरण विश्वकर्मा आणि रामबहर भवर बैगा अशी जखमींची नावे आहेत. सासवड पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद नोंद केली आहे.
सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरंदर किल्ल्यावर दुरुस्तीचे काम सुरू आहे. यासाठी राजकुमार विश्वकर्मा हा आपल्या ताब्यातील सिमेंट मिक्सर ग्राईंडर किल्ल्यावर घेऊन जात असताना उतारावर त्याचा ताबा सुटला. यात मिक्सर ग्राईंडर ३० ते ४० फूट खोल कोसळले. याप्रकरणाचा अधिक तपास सासवड पोलीस करीत आहेत.