आळंदी (पुणे) - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदी मंदिरातून शुक्रवारी (दि.२ जुलै) रोजी मोजक्याच भाविकांचे उपस्थितीत प्रस्थान होणार आहे. त्यामुळे आळंदीत राज्यभरातून आलेल्या २०४ वारकऱ्यांची काल आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यामध्ये आळंदीचे नागराध्यक्ष, देवस्थान मधील एक कर्मचाऱ्यासह तब्बल २२ वारकऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आळंदीत एकच खळबळ उडाली आहे. कोरोना चाचणी तापसणीपूर्वी हे वारकरी ज्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी त्वरित आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आळंदी देवस्थान व आळंदी ग्रामीण रुग्णालय यांच्या माध्यमातून राज्यभरातून आलेल्या निमंत्रित वारकरी, मानकरी, टाळकरी, गावकरी यांची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. राज्यातून आळंदीत आलेल्या वारकऱ्यांना कोरोना चाचणी केल्यानंतर फ्रुटसवाले धर्मशाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या वारकऱ्यांना म्हाळुंगे कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. आळंदी पालखी सोहळ्यावर कोविड १९ चे सावट असून मागील वर्षी प्रमाणे मोजक्याच वारकरी भाविकांत संत ज्ञानेश्वर महाराज पादुका पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (दि. २ जुलै) रोजी प्रस्थान होणार आहे. यासाठी आळंदी देवस्थान, आळंदी पोलीस, खेड महसूल, विद्युत विभाग, आळंदी नगरपरिषद, आळंदी ग्रामीण रुग्णालय आरोग्य सेवा प्रशासन कोविड १९ चे मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत तयारी करीत आहे.