पुणे- कसबा विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराविरोधात बंडखोरी करणारे शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी शिवसेना पक्षातून राजीनामा दिला आहे. त्यांच्याबरोबर कसबा आणि पुणे येथील इतर मतदारसंघातील २०० शिवसेना पदाधिकाऱ्यांनी देखील पक्षाला राजीनामा दिला आहे.
पुणे शहरात शिवसेनेला एकही जागा न दिल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. त्यामुळे शहरातल्या काही मतदारसंघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली होती. मात्र त्यानंतर कार्यकर्त्यांनी माघार घेतली होती. मात्र कसबा विधानसभा मतदारसंघात नगरसेवक विशाल धनवडे यांनी आपली बंडखोरी कायम ठेवली होती. विशाल धनवडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सातत्याने भाजपकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली जात होती. त्यामुळे पक्षप्रमुखांना संकटात न आणण्याचा निर्णय घेत असल्याचे सांगत विशाल धनवडे यांच्यासह २०० शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून पक्षाला सोडचिट्टी दिली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात खासदार गिरीश बापट हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणत असल्याचा आरोपही धनवडे यांनी केला आहे.
हेही वाचा- 'राज्यासह पुण्यात काँग्रेसचे अस्तित्वच दिसत नाही'