पुणे - नुकतीच तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर पुण्यातील गुंड गजानन मारणे याचे त्याच्या दोनशेपेक्षा अधिक साथीदारांनी स्वागत केले होते. द्रुतगती मार्गावरील फूड मॉल येथे फटाके वाजवत दहशत पसरवून त्याचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आले होते. या प्रकरणी त्याच्या ताफ्यातील 17 जणांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली असून 11 महागड्या गाड्या आणि 12 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी गजानन मारणे याचा शोध घेण्यासाठी चार तपास पथक तयार करण्यात आली असून त्याचा शोध घेत आहेत.
उर्से टोल नाका येथे आरडाओरडा करून निर्माण केली होती दहशत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंड गजानन मारणे याची नुकतीच तळोजा कारागृहातून सुटका झाली असून त्याच्या साथीदारांनी जंगी स्वागत करत पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोठा जल्लोष केला होता. याचे व्हिडिओ व्हाट्सएपवर चांगलेच व्हायरल झाले होते. दरम्यान, उर्से टोल नाका येथील फूड मॉल इथे सर्वांनी थांबून फटाके वाजवत आरडाओरडा केला होता. तसेच, याचे चित्रीकरण ड्रोन द्वारे करण्यात आले होते.
17 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत
याप्रकरणी गजनन मारणे याच्यासह ताफ्यातील 30 ते 40 गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अद्याप 200 वाहने आणि आरोपी यांना अटक करणे बाकी असून 9 तपास पथके आरोपींच्या शोध घेण्यास रवाना करण्यात आले आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपींचा शोध घेण्यासाठी चार पथके रवाना करण्यात आली आहेत
मुख्य आरोपी गजानन पांडुरंग मारणे, रुपेश कृष्णराव मारणे, सचिन आप्पा ताकवले, श्रीकांत संभाजी पवार, अनंता ज्ञानोबा कदम, प्रदीप दत्तात्रय कंदारे, बापू श्रीमंत बाबर, गणेश नामदेव हुंडारे, सुनिल नामदेव बनसोड यांच्यासह इतर आरोपींना अटक करणे बाकी असून त्याचा शोध घेण्यासाठी चार पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत.