पुणे - संपूर्ण भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने कोविशील्ड या लसीला मान्यता दिल्यानंतर पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून ही लस देशातील वेगवेगळ्या राज्यात रवानाही करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला 9 लाख 63 हजार कोविशील्ड लसीचे डोस आले असून, त्यातील 1 लाख 11 हजार डोस पुणे जिल्ह्याला देण्यात येणार आहेत.
हेही वाचा - किरकोळ कारणावरून मित्राने मित्राची दुचाकी पेटवली; दहा दुचाकी जळून खाक
देण्यात येणाऱ्या लसीच्या साठ्यातून 60 हजार डोस पुणे शहराला, 15 हजार पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागासाठी 36 हजार लसीचे वाटप करण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी प्रसाद यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक पुणे आणि मुंबई या दोन शहरात झाला होता. त्यामुळे, या दोन शहरात कशाप्रकारे लसीकरण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक 72 लसीकरण केंद्र मुंबईत आहेत. त्यानंतर पुणे जिल्ह्यात 55 लसीकरण केंद्र आहेत. यामध्ये 16 पुणे शहरात, 16 पिंपरी चिंचवड शहर आणि 23 जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असणार आहेत. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील खासगी आणि सरकारी आरोग्य सेवकांना ही लस देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेने शहरातील खासगी आणि सरकारी कर्मचार्यांची माहिती मागवली होती. त्यानुसार पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे 52 हजार 702 कर्मचाऱ्यांची नोंद झाली आहे. शहरातील 4 खासगी रुग्णालये आणि 12 महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये हे लसीकरण करण्यात येणार आहे.
पुण्यातील या रुग्णालयात होणार लसीकरण
सुतार दवाखाना कोथरूड, कमला नेहरू दवाखाना, राजीव गांधी रुग्णालय, कलावती मावळे दवाखाना, शंकर महाराज दवाखाना, बाळासाहेब ठाकरे रुग्णालय, शिवरकर दवाखाना, एकनाथ निम्हण प्रसुतीगृह, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, दळवी रुग्णालय, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, भारती हॉस्पिटल, नोबल हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, जोशी हॉस्पीटल, जम्बो हॉस्पिटल.
हेही वाचा - जखमी पक्ष्यांच्या बचावासाठी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानतर्फे हेल्पलाईन - डॉ. कल्याण गंगवाल