परभणी - खासगी सावकाराकडून मिळत असलेल्या कर्जफेडीच्या धमक्यांना कंटाळून तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना सोनपेठ तालुक्यातील तिवठाणा येथे घडली आहे. विषारी औषध प्राशन करत या शेतकऱ्याने आपले जीवन संपवले. धक्कादायक म्हणजे या शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी 'सुसाईड नोट'चे व्हाट्सअॅपला स्टेटस ठेवले होते. चंद्रकांत उर्फ मुंजाजी भगवान धोंडगे (वय ३०) असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
व्हाट्सअॅप स्टेटसवर आत्महत्येचे अपडेट -
चंद्रकांत उर्फ मुंजाजी भगवान धोंडगे हा सोनपेठ तालुक्यातील तिवठाणा येथील रहिवासी होता. मंगळवारी दुपारी १२:२३च्या सुमारास त्याने व्हाट्सअॅप स्टेट्सवर तीन अपडेट ठेवले. यात ''मी शेतात आहे, माझी उद्या सकाळी माती आहे. सर्वांनी यावे. मला पैशामुळे धमक्या येत आहेत, म्हणून मी आत्महत्या करत आहे. माझ्या मुलांचा सांभाळ करावा, पैशामुळे मला त्रास झाला'', असा मजकूर असलेल्या चिठ्ठ्यांचे फोटो स्टेटसवर ठेवले.
पश्चात पत्नी, सहा वर्षीय मुलगा, दोन वर्षीय मुलगी -
या स्टेटसनंतर त्याने शेतात विषारी द्रव्य प्राशन केले. चंद्रकांत याने ठेवलेल्या स्टेटसची माहिती त्याचे चुलते हनुमान गणपतराव धोंडगे यांना मिळताच त्यांनी शेतात धाव घेतली. अत्यवस्थ चंद्रकांतला त्यांनी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती मुंडे यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्याच्या पश्चात पत्नी, सहा वर्षीय मुलगा, दोन वर्षीय मुलगी, एक भाऊ, एक विवाहित बहीण असा परिवार आहे.
धमक्या देणाऱ्या सावकाराचा शोध सुरू -
गंगाखेड पोलीस ठाण्याचे जमादार एम.जी.सावंत, जमादार गोविंद मुरकुटे यांनी शवविच्छेदनापूर्वी पंचनामा केला. याची कागदपत्रे सोनपेठ पोलीसांच्या स्वाधीन केली आहेत. पोलिसांकडून आता या सावकाराचा शोध घेतला जात असून, नेमके कोण धमक्या देत होते, त्याचा तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, गावातील चर्चेतून खासगी सावकाराने लावलेला पैशासाठी तगादा आणि ते पैसे कसे फेडावे ? हा प्रश्न चंद्रकांत समोर असल्याने यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. ग्रामीण भागात अवैध सावकारी बळावली असून तालुका निंबधक कार्यालयाने अशा घडणाऱ्या घटनांतून बोध घेऊन नियमबाह्य सावकारी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा - द्रविडच्या 'त्या' फोन कॉलमुळे अजिंक्यचे पालटले आयुष्य