परभणी - परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यातील पूर्णा व मानवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत 6 ट्रॅक्टर आणि 1 टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी 12 आरोपींविरोधात गुन्हा नोंद केला असून, तब्बल 32 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पूर्णा हद्दीत रेतीने भरलेला टिप्पर जप्त -
पूर्णा शहरातील लक्ष्मीनगर येथे एक रेतीने भरलेला टिप्पर वाळूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने येत असल्याची खात्रीशीर माहीती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा रचला. माहितीनुसार सोमवारी रात्री तेथे रेतीने भरलेला टिप्पर येताच तो पोलिसांनी ताब्यात घेतला. या टिप्परची किंमत 8 लाख रुपये असून, त्यातील वाळूसह पोलिसांनी 8 लाख 18 हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी चालक आणि मालकाविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मानवत हद्दीत 6 ट्रॅक्टर जप्त -
स्थानिक गुन्हे शाखेच्या दुसऱ्या पथकाला सोमवारी रात्रीच मानवत हद्दीतील कोठाळा येथे 6 रेतीने भरलेले ट्रॅक्टर वाळूची चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने येत आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती. या ठिकाणी कार्यवाही करत पोलिसांनी रेतीने भरलेला 6 ट्रॅक्टर ताब्यात घेतले. या ट्रॅक्टरची किंमत 24 लाख रुपये असून, त्यातील वाळूसह एकूण 24 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन 10 आरोपींविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई -
ही कारवाई पोलीस अधीक्षक जयंत मीना, अपर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरक्षक चंद्रकांत पवार, विश्वास खोले, पोलीस कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, शंकर गायकवाड, यशवंत वाघमारे, दीपक मुदिराज, अरुण कांबळे, दिपक मुंढे यांनी केली. यावेळी कोणत्याही प्रकाराच्या अवैध धंद्याबाबत माहिती असल्यास पोलीस अधीक्षक कार्यालय येथे 9673888868 या मोबाइल क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलीस दलाच्या वतीने देण्यात आली आहे.