परभणी- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी पदविका आणि पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन पुकारले आहे. विद्यार्थ्यांनी कृषी महाविद्यालयातून कुलगुरूंच्या कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार घोषणाही दिल्या. कार्यालयासमोर ठिय्या मांडत या विद्यार्थ्यांनी मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा घेतला आहे.
हेही वाचा- नावावरुन गोंधळ.. एअर इंडियानं दुसऱ्याच एका कामराचं तिकीट केलं रद्द
परभणी कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांना कुलगुरूंच्या मार्फत या संदर्भातील निवेदन दिले होते. त्यात कृषी विद्यापीठातील वसतिगृहाच्या समस्या, बंद करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू कराव्यात, परीक्षेचा निकाल 25 दिवसांच्या आत द्यावा, नियमित शैक्षणिक सहली काढाव्यात, निर्वाहभत्ता द्यावा, ज्या महाविद्यालयांना प्राचार्य नाही व प्राध्यापकांचा तुटवडा आहे, त्या ठिकाणी लवकर भरती करावी, कृषी पदवीकेला व्यावसायिक दर्जा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता.
राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे लक्ष दिले नाही. दरम्यान दोन दिवसात विद्यापीठ स्तरावरील ज्या अडचणी आहेत. त्या विद्यापीठाने सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, राज्यस्तरावरील अडचणी अद्याप सुटल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपापल्या वसतिगृहातून बाहेर पडून कुलगुरू अशोक ढवण यांच्या कार्यालयावर मोर्चा धडकवला. आंदोलक विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कुलगुरूंच्या प्रशासकीय इमारतीपुढे ठिय्या मांडला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेत विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, बुधवारी दुपारपर्यंत या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नव्हती.