परभणी - अधिकार नसताना एका पोल्ट्री फार्मवर जाऊन खाकी दाखवत तपासणी करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. तर, दुसऱ्या प्रकरणात कर्मचाऱ्याने एका गुन्ह्याची माहिती पोलिसांपासून लपवल्यामुळे त्यालाही निलंबित करण्यात आले आहे. या दोघांचीही कार्यालयीन चौकशी सुरु केली गेली आहे.
परभणी पोलीस अधीक्षकांच्या या कठोर भूमिकेमुळे पोलिसांमधील काही बेशिस्त कर्मचाऱ्यांना निश्चितच लगाम बसेल. काही अपवादात्मक पोलिसांकडून आपल्या अधिकारांचा गैरवापर होत असल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत.
पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपाई ब्रह्मानंद कोल्हे यांनी मानोली रस्त्यावरील कैलास पोल्ट्री फार्ममधील महिला मजूरांना 12 एप्रिलला रात्री 10 वाजता झोपेतून उठवले. मी पोलीस अधीक्षकांच्या पथकातील कर्मचारी आहे. पोल्ट्री फार्म तपासायचा आहे, असे सांगून रूमची तपासणी केली. याठिकाणी कर्तव्य नाही, याची जाण असतानासुद्धा त्या ठिकाणी जात त्यांनी बेशिस्तपणाचे वर्तन केल्याबद्दल पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी त्यांच्या विरूध्द मंगळवारी निलंबनाचे आदेश काढले.
दुसऱ्या प्रकरणात दोन गटातील लोक जखमी झाल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले होते. त्यावेळी नवा मोंढा पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रल्हाद रेखाजी यांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले. परंतु, राठोड यांनी रात्रगस्त अधिकारी किंवा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली नाही. त्यामुळे, 20 एप्रिलला त्या दोन गटात पुन्हा मोठ्या स्वरूपाचे भांडण होऊन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले.
राठोड यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अधिकाऱ्यांना माहिती दिली असती, तर दोन्ही गटांना पायबंद घालता आला असता. गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडले नसते. त्यामुळे, बेजबाबदारपणा केल्याबद्दल राठोड यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्याविरूध्द खातेनिहाय प्राथमिक चौकशीदेखील सुरू केल्याची माहिती परभणी पोलीस प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.