परभणी - मागील दोन दिवसांप्रमाणे आज देखील (शुक्रवारी) परभणी जिल्ह्यात 2 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात 23 नवीन रुग्ण देखील आढळून आले आहेत. याशिवाय 58 संभाव्य रुग्णदेखील जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. एकूणच जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 481 वर जाऊन पोचला आहे. त्यातील आत्तापर्यंत 21 रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्य परिस्थितीत 239 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
परभणी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. जुलै महिन्यात तर यात लक्षणीय वाढ झाली आहे. जूनमध्ये शंभर बाधित असलेल्या परभणी जिल्ह्यात जुलै महिन्यातील 24 दिवसात तब्बल 380 रुग्ण आढळून आले आहेत. यातील 21 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यापासूनच बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ज्यामध्ये 22 जुलै रोजी 2, त्यानंतर काल 23 जुलैला 3 आणि आज 24 जुलै रोजी देखील 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये परभणी शहरातील फेरोज टॉकीजजवळील 50 वर्षीय कोरोनाग्रस्त पुरुषाचा समावेश आहे. त्यांना रक्तदाबाचा त्रास होता. याशिवाय पूर्णा शहरातील महावीर नगरात राहणाऱ्या 52 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा सुद्धा कार्डियाक अरेस्टमुळे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
या दरम्यान गेल्या 24 तासात परभणी जिल्ह्यात 23 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये परभणी जिल्ह्यात 17 रुग्ण आहेत, तर परभणी जिल्ह्यातील रहिवासी आणि नांदेड, औरंगाबाद येथे उपचार घेणाऱ्या 6 जणांचा समावेश आहे. या शिवाय परभणी जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात आज नवे 58 संभाव्य रुग्ण देखील दाखल झाले आहेत. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 481 वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी 221 जणांना कोरोना मुक्त झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे, तर त्यातील 21 जण मरण पावले आहेत. त्यामुळे उर्वरित 239 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील कोरोना संक्रमित कक्षात उपचार सुरू आहेत. यादरम्यान मार्च महिन्यापासून आतापर्यंत 4 हजार 18 संभाव्य रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यातील 3 हजार 627 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर सध्या परिस्थितीत 488 जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
यापूर्वी 3 हजार 242 जणांनी आपला विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे. सद्यपरिस्थितीत 42 जणांचा अहवाल अजूनही प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहेत. तरी यापूर्वी 125 रुग्णांचे अहवाल अनिर्णायक असल्याचा निर्वाळा प्रयोगशाळेने दिला आहे. तर 52 जणांचे अहवाल फेटाळून लावण्यात आले आहेत.
'हे आहेत आजचे रुग्ण'
दरम्यान, आज आढळून आलेल्या रूग्णांमध्ये परभणी शहरातील नवा मोंढा भागातील एकाच कुटुंबातील 7 रुग्ण आहेत. या ठिकाणच्या एका मोठ्या व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनादेखील त्याची बाधा झाली असून, त्यांना उपचारासाठी गुरुवारीच औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मोंढ्यातील पश्चिमेकडील भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तो परिसर पोलिसांकडून सील करण्यात आला असून महापालिका निर्जंतुकीकरणाचे काम करत आहे. याशिवाय शहरातील फेरोज टॉकीज जवळ 50 वर्षीय रुग्ण आढळून आला आहे. तसेच गंगाखेड शहरातील जैदीपुरा भागातील 3 तर भंडारी कॉलनी येथील 3 आणि नवा मोंढा भागातील 3 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.
याशिवाय गंगाखेड शहरातीलच दिलकश चौक, हाटकर गल्ली या भागात तीन रुग्ण आढळून आले असून, गंगाखेडच्या ग्रामीण भागातील धारखेड येथे 65 आणि 70 वर्षीय असे दोन रुग्ण आढळून आहेत. या प्रमाणेच जिंतूर शहरात 25 वर्षीय रुग्ण आढळून आला असून, पाथरी शहरात 16 वर्षीय युवतीसह 41 आणि 33 वर्षीय तरुण रुग्णदेखील आढळून आले आहेत. समाधानाची बाब म्हणजे आज दिवसभरात 5 रुग्णांना कोरणा मुक्त झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये परभणी शहरातील सरफराज नगर आणि दर्गा रोड येथील 55 आणि 62 वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे. याप्रमाणे जिंतूर तालुक्यातील बोरीचा 25 वर्षीय तरुण आणि सेलू तालुक्यातील वालुर येथील 26 व 28 वर्षीय दोन तरुण रुग्णांना कोरणा मुक्त झाल्याने सुट्टी देण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.