परभणी - जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने शहरातील बसस्थानक परिसरातील एका लॉजमधून 23 किलो गांजा जप्त केला. या कारवाईत 1 लाख 13 हजार 785 रुपये किंमतीच्या गांजासह एकूण 1 लाख 63 हजार 785 रुपयांचा मुद्देमालदेखील जप्त केला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. विकास दाभाडे व युवराज भदर्गे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
प्रवाशी बॅगमध्ये भरून विक्री केला जात होता गांजा -
परभणीतील बसस्थानक परिसरातील एका लॉजमध्ये काही व्यक्तींनी अंमलीपदार्थ तथा गांजा अवैध विक्रीसाठी आणला असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यानंतर पथकाने शुक्रवारी मध्यरात्री लॉज परिसरात छापा टाकला. त्यावेळी तेथ दोन व्यक्ती आढळून आले. त्यांच्याजवळील साहित्याची तपासणी केली असता, तीन वेगवेगळ्या पिशव्यात अंमली पदार्थ आणि गांजा आढळून आला. यापैकी एका प्रवाशी बॅगमध्ये प्लास्टीकच्या पाकीटात 10 किलो 33 ग्रॅम वजनाचा अंदाजे 51 हजार 670 रुपयांचा गांजा आढळून आला. तर दुसर्या बॅगमध्ये 9 किलो 36 ग्रॅम अंदाजे 45 हजार 180 रुपये किंमतीचा, तर तिसर्या बॅगमध्ये 16 हजार 935 रुपये किंमतीचा 3 किलो 387 ग्रॅम वजनाचा गांजा आढळला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण 1 लाख 13 हजार 785 रुपयांचा गांजा जप्त केला. त्याचबरोबर 1 मोटारसायकल, मोबाईल असा संपूर्ण 1 लाख 63 हजार 785 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हेही वाचा - उत्तराखंड हिमस्खलन: सहाव्या दिवशीही बचावकार्य सुरू; ३६ मृतदेह सापडले २०६ बेपत्ता