परभणी - अवैध वाहतूक, चालक परवाना आणि इतर कागदपत्रांच्या तपासणीसाठी गेल्या आठवड्यात प्रादेशिक परिवहन विभागाने मोहीम उघडून परभणीतील शेकडो ऑटो पकडले. हे ऑटो एसटी महामंडळाच्या गंगाखेड रोडवरील कार्यशाळेत लावण्यात आले. मात्र, या ठिकाणी अनेक ऑटोमधील बॅटरी, टेपरेकॉर्डर आणि पेट्रोल मोठ्या प्रमाणात गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार सोमवारी सायंकाळी उघडकीस आला असून यात अनेक गरीब ऑटोचालकांना भुर्दंड बसत आहे.
राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा 14 ऑगस्टला परभणी दौरा झाला होता. मात्र, त्याच दिवसापासून कागदपत्र तपासणीच्या नावाखाली प्रादेशिक परिवहन विभागाने ऑटो पकडण्याची मोहीम सुरू केली. यामध्ये पहिल्या २-३ दिवसात ३५० पेक्षा अधिक ऑटो पकडून ते एसटी महामंडळाच्या गंगाखेड रोडवरील कार्यशाळेच्या आवारात लावण्यात आले आहेत. त्यानंतर २०० ते ८ हजार रुपयांपर्यंत दंडाची रक्कम भरून ऑटोचालक ऑटो सोडवून नेत आहेत. परंतु या ठिकाणी आल्यानंतर त्यांना आपल्या ऑटोमधील विविध सामान चोरीला गेल्याचे लक्षात येत आहे. बहुतांश ऑटोमधून चालकाच्या सीटखाली असलेली बॅटरी काढून घेतल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच अनेक ऑटोमधून टेपरेकॉर्डर आणि साउंड बॉक्स काढण्यात आले आहेत. शिवाय बहुतांश ऑटोमधील पेट्रोल काढून घेतल्याचे प्रकार देखील उघडकीस आले आहेत. याबद्दल ऑटोचालक संताप व्यक्त करत असून 'आमच्या चोरीला गेलेल्या वस्तू तात्काळ मिळवून द्या, अशी मागणी ते एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे करत आहेत.
परंतु यासंदर्भात बोलताना एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ऑटो चालकांनी आरटीओकडे लेखी तक्रार द्यायला हवी, मग त्यांच्या सूचनेनुसार आम्ही पुढील कारवाई करू. तसेच गरज पडल्यास पोलिसात तक्रारही करण्यात येईल, अशी माहिती या ठिकाणचे दक्षता व सुरक्षा अधिकारी वानखेडे यांनी दिली. दरम्यान, चोरीचा छडा लावण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाचे सुरक्षा अधिकारी गायकवाड यांच्याकडून प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणीही करण्यात येत आहे. ही पाहणी करून आम्ही पुढील कारवाई करू, असेही वानखेडे यांनी सांगितले.
या संदर्भात अनेक ऑटोचालक पोलिसात जाऊन तक्रार करण्याची शक्यता आहे. आरटीओंनी अनेकांना ४ ते ६ हजार रुपयांचा दंड लावला आहे. 'एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड भरल्यानंतर आमच्या ऑटोतून सामानाची चोरी होत असल्याने हा नवीन भुर्दंड आम्हाला सहन होणार नाही, असे म्हणत अनेक ऑटोचालक एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहेत. तर आरटीओ तसेच एसटी महामंडळाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देखील काही ऑटो चालकांनी केली आहे.