परभणी - मागील तीन दिवसंपासून परभणीच्या तापमानाचा पारा घसरत असून, आज मंगळवारी ५.१ अंश सेल्सिअस इतके निचांकी तापमान नोंदवण्यात आले आहे. यामुळे परभणीकरांना प्रचंड बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. काल (सोमवारी) दिवसभर थंडीची झुळूक अनुभवयास मिळाली. आज देखील हाच अनुभव येण्याची शक्यता आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्याचा आधार घेत असून स्वेटर, मफलर, कानटोपी घालूनच घराबाहेर पाडताना दिसत आहेत.
हेही वाचा - क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आयपीएलबाबत एक वाईट बातमी
परभणी जिल्ह्यात यंदा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडी दाखल झाली. मात्र ऐन दिवाळीत तापमानात वाढ झाल्याने वातावरणातील गारवा नाहीसा झाला होता. त्यानंतर आता पुन्हा तापमानात घट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून परभणीचे किमान तापमान १० अंशाच्या खाली आले आहे. काल (सोमवार) निच्चांकी तापमान ५.६ अंश नोंदविण्यात आल्यानंतर आज (मंगळवारी) त्यात पुन्हा घसरण होऊन ५.१ अंश सेल्सिअस एवढ्या निच्चांकी तापमानाची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागात झाली आहे. या वर्षातील हे आता पर्यंतचे सर्वात कमी तापमान असून, यापुढे त्यात आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पाणीसाठ्यांमुळे थंडीचा उद्रेक...
दरम्यान, परभणी जिल्ह्याचे तापमान गेल्या काही वर्षापासून कमालीचे खाली उतरत आहे. २०१८च्या हिवाळ्यात जिल्ह्यात तापमानाचा पारा चक्क २ अंशापर्यंत खाली उतरला होता. यंदा देखील तापमानाचा पारा अशाच पद्धतीने खाली जाण्याची शक्यता आहे. यंदा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार उडवून दिला होता. ज्यामुळे जिल्ह्याची पाणी पातळी देखील वाढली आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक झाली आहे. अनेक प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. शिवाय जिल्ह्यातील डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. ज्यामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी देण्यात आले आहे. परिणामी, जिल्हयात थंडीचा कडाका वाढल्याचे दिसून येत आहे.
पारा आणखी घसरणार...
यावर्षी जागतिक वातावरणावर 'ला-निनो' चा प्रभाव आहे. ज्याचा अधिक परिणाम परभणीवर होण्याची शक्यता आहे. शिवाय महिनाभर परतीच्या पावसाने मुसळधार हजेरी लावली. ज्यामुळे नदी, नाले, तलाव आणि धरणे काठोकाठ भरलेली आहेत. यामुळे या शहराचे तापमान येणाऱ्या काही दिवसात आणखी खाली येण्याची शक्यता यापूर्वीच विद्यापीठातील हवामान विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी वर्तवली आहे. त्यामुळे यावर्षी तापमानाचा पारा खाली उतरून नवीन विक्रम होतो का? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
निच्चांकी तापमानाचा इतिहास...
मराठवाड्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद परभणीत होत असते. त्या प्रमाणेच किमान तापमानाची देखील नोंद येथेच झालेली आहे. २ अंश इतकी निचांकी तापमानाची नोंद २९ डिसेंबर २०१८ रोजी झाली होती. याप्रमाणेच १७ जानेवारी २००३ ला २.८ आणि १८ डिसेंबर २०१४ रोजी ३.६ अंश एवढया निचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
शेकोट्या पेटल्या, गरम कपडे घालून नागरिकांचा मॉर्निग-वॉक...
कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्यांचा सहारा घेताना दिसत आहेत. शिवाय सकाळी आणि सायंकाळनंतर घराबाहेर पडताना गरम कपडे घालणे बंधनकारक झाले आहेत. हुडहुडी भरवणाऱ्या या थंडीमुळे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात गरम कपडे, कानटोपी, मफलर घालूनच बाहेर पडावे लागत आहे. दरम्यान, गुलाबी थंडीचा आनंद घेत शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, पोलिस ग्रॉऊंड, वसमत रोड, जिंतूर रोड, नांदखेड रोड, गंगाखेड रोड तसेच अन्य भागात फिरणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. शिवाय सायकलिंग करणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय झाली आहे.
हिंगोलीत पेटल्या शेकोट्या, थंडीचा जोर वाढला...
संपूर्ण राज्यात दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. त्याच धर्तीवर हिंगोली जिल्ह्यातही दोन दिवसापासून हुडहुडी भरली आहे. हिंगोली जिल्ह्याचे तापमान जवळपास 11 अंशावर पोहोचले आहे. या थंडीमुळे रब्बीतील पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. थंडी घालवण्यासाठी जिल्ह्यात विविध भागात शेकोट्या पेटल्या आहेत.
राज्यातील तापमान -
रत्नागिरी तापमान
- कमाल २९
- किमान १७
जळगाव तापमान
- कमाल २९
- किमान ११
बीड तापमान
- कमाल २८
- किमान १२
रायगड तापमान
- कमाल २७
- किमान १८
गोंदिया तापमान
- किमान ९
औरंगाबाद तापमान
- किमान १०
नाशिक तापमान
- किमान ८.४
ठाणे तापमान
- किमान २१
अमरावती तापमान
- किमान १५
लातूर तापमान
- किमान १५
बुलडाणा तापमान
- किमान १५
जालना तापमान
- किमान ११.२
भंडारा तापमान
- कमाल २८
- किमान १०
उस्मानाबाद तापमान
- किमान १४
कोल्हापूर तापमान
- कमाल ३०
- किमान १४
पुणे तापमान
- किमान ९.२
अकोला तापमान
किमान ९.६
हिंगोली तापमान
- कमाल २९
- किमान ११
सांगली तापमान
- कमाल १८
- किमान २३