परभणी - वांगी या गावाला परभणीशी जोडणारा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून रखडला आहे. याच रखडलेल्या कामाची माती घेऊन येथील कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात टाकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र, कार्यकारी अभियंते जागेवर नसल्याने हीच माती त्यांच्या खुर्चीवर आणि टेबलावर टाकून शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत जोरदार निषेध केला.
जिल्ह्यातील असंख्य गावांचे रस्त्याअभावी आतोनात हाल होत आहेत. पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर या गावांचा संपर्कच तुटतो. त्यामुळे खेडे गावातील दळण-वळणाची व्यवस्था बंद पडून गावांतील शिक्षण, आरोग्य आणि इतर मूलभूत सोयी बंद होतात. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील ज्या गावांचा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजुर झालेला आहे, त्या कामांची सुरुवात अजुनही झालेली नाही. या प्रकरणी तात्काळ लक्ष घालुन कामांना सुरवात करावी, अशी मागणी यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती. मात्र, त्याकडे येथील कार्यकारी अभियंता दुर्लक्ष करत आहेत. तालुक्यातील मौजे वांगी येथील रस्त्याचे काम इतर गावांप्रमाणे बंद अवस्थेत आहे. ते तात्काळ सुरु करण्यात यावे, यासाठी आजचे अणोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी रखडलेल्या रस्त्याच्या कामाची माती आणून ती कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीत तसेच त्यांच्या टेबलवर टाकण्यात आली. जोरदार घोषणा देण्यात देत शेतकऱ्यांनी संपूर्ण कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. 'रस्ता आमच्या हक्काचा...., देत कसे नाही, अशी घोषणाबाजी करत रखडलेल्या रस्त्याच्या कामाचा निषेधही नोंदवण्यात आला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, देविदास शिंदे, प्रल्हादराव शिंदे, भारकर खटींग, बालाजी गरड, राज शिंदे, रामभाऊ अवरंगंड, अंगद शिंदे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.