परभणी - घरात झोपलेल्या वडीलांवर चाकूने सपासप वार करून मुलाने हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला असून, आरोपी मुलाला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. युसुफ खान अब्दुल माजिद खान पठाण असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून मैनू खान असे आरोपीचे नाव आहे.
शहरातील विकास नगर भागात ही घटना घडली आहे. आरोपी मैनू खान हा युसुफ खान अब्दुल माजिद खान पठाण यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. मैनू खान याचा वडील युसुफ खान यांच्याशी कौटुंबिक वाद होता. याच वादातून शनिवारी दुपारी युसुफ खान हे आपल्या घरात झोपलेले असताना अचानक आलेल्या मैनू खानने त्यांच्या छातीवर व पोटावर चाकूचे सपासप वार केले. रक्तबंबाळ झालेल्या युसुफ खान यांना तत्काळ नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आणले, परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली असून, घटनास्थळाला सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बगाटे यांनी देखील भेट देऊन माहिती घेतली आहे. दरम्यान, ही घटना कौटुंबिक वादातून घडली असून, याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात संध्याकाळी उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.