परभणी - 5 जुलै हा दिवस सर्वत्र गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरुविषयी आपली भावना व्यक्त करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे काम केले जाते. या अनुषंगाने 'ईटीव्ही भारत'ने 'तस्मै श्री गुरुवे नम:' या मालिकेच्या माध्यमातून राज्यातील विविध सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या सर्वांनी आपापल्या गुरुविषयी आपली भावना व्यक्त करत त्यांचे आभार मानले. तसेच त्यांच्या शिकवणी आणि आठवणींना उजाळा दिला.
परभणी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर -
गुरुला प्रत्येकाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असते, अशी भावना जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी व्यक्त केली आहे. या वेळेच्या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर कोरोनाची लढाई जिंकायची आहे, असा निर्धारही त्यांनी केला.
ते म्हणाले, प्रत्येकाच्या जीवनात गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण असते. गुरुला देवापेक्षा मोठे स्थान आहे. मात्र, सध्या कोरोनाच्या महामारीमुळे यंदाची गुरुपौर्णिमा आपल्याला घरातच बसून साजरी करायची आहे. त्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे, सतत हात धुणे आणि सामाजिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करायचा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या उत्सवा दरम्यान कोरोनाला हद्दपार करायचे आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी केले.