परभणी - येथील सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर आज (गुरुवारी) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मूक आंदोलन करत शासनाचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी बीड येथील आत्महत्याग्रस्त विद्यार्थी विवेक रहाडेचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नसल्याचे नमूद करत आंदोलनकर्त्यांनी विवेकला श्रद्धांजली अर्पण केली.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात विविध मार्गाने सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलने करण्यात येत आहेत. लोकप्रतिनिधींच्या घरापुढे ढोल वाजवणे असो किंवा धरणे असो, अशा पद्धतीने ही आंदोलने सुरू आहेत. त्याप्रमाणेच बीड जिल्ह्यातील कोतूर येथील विद्यार्थी कल्याण रहाडे याने आत्महत्या केल्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्रतेने होण्याची चिन्हे आहेत. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात कार्यकर्ते तोंडास काळी पट्टी बांधुन या आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी काही काळ रस्त्यावर धरणेही धरण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक सुभाष जावळे यांनी यावेळी राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. ते म्हणाले, 'बीड जिल्ह्यातील केतूरा येथील विवेक कल्याण रहाडे हा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी मराठा आरक्षणास स्थगिती मिळाल्यापासून उदास होता. आरक्षणास स्थगिती मिळाल्याने पुढे कसे होईल ? आपल्याला संधी मिळेल का नाही?, याच विचारात तो सातत्याने राहू लागला. याच दडपणातून त्याने काल (बुधवारी) गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले. त्याने आरक्षणाच्या मागणीसाठी विवेकने बलिदान दिले आहे. त्याचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही, असे जावळे यावेळी म्हणाले.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी आंदोलनाच्या शेवटी विवेक रहाडे याला श्रध्दांजली अर्पण केली. या मूक आंदोलनात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचा समावेश ओबीसी संवर्गात करून आरक्षण देण्याची मागणी अनेक नेते व अनेक संघटना करीत आहेत. मात्र, ओबीसी महासंघाने याला विरोध केला आहे. मराठा आरक्षणाला आमचे समर्थन आहे. मात्र, ओबीसी संवर्गात त्यांचा समावेश करू नये, अशी भूमिका महासंघाची आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर मार्ग काढण्यासाठी शिवसंग्राम पक्षातर्फे येत्या 3 ऑक्टोबर रोजी विचारमंथन बैठक आयोजित करण्यात आली आहे.