परभणी - जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संचारबंदीत परभणी महानगर पालिका क्षेत्र आणि 5 किमी परिसरात आणखी 5 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी बजावलेल्या आदेशानुसार शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे.
जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केलेल्या शनिवार-रविवार या नियमित संचारबंदीप्रमाणे रविवारी मध्यरात्रीपर्यंत बाजारपेठेत 'लॉकडाऊन' राहणार आहे. दरम्यान, जुलै महिन्याच्या पहिल्या तारखेपासून परभणी तब्बल 900 हुन अधिक कोरोनाबाधितांची भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदीसारख्या उपाययोजना करून कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.
जिल्ह्यात गेल्या 40 दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच मागच्या 15 दिवसांत दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांमुळे जिल्हा प्रशासनात चिंता निर्माण झाली. सद्य परिस्थितीत परभणी जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 50 झाला असून, त्यातील 546 रुग्ण ॲक्टीव्ह आहेत, तर 50 जणांचा मृत्यू झाला. त्याामुळे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी प्रत्येक शनिवार, रविवार जिल्ह्यात संचारबंदी जाहीर केली आहे. त्यानुसार मागच्या शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपासून रविवारी मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यात रविवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी नवीन आदेश बजावत आणखी 5 दिवस संचारबंदी लागू केली. त्यानुसार परभणी शहर आणि 5 किमी च्या परिसरात शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदीत वाढ करण्यात आली, तर यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शनिवार-रविवार हे दोन दिवस जिल्ह्यात नियमित संचारबंदी राहील. त्यानुसार पुन्हा 7 दिवस संचारबंदी लागून रविवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊन असणार आहे.
जिल्ह्यातील सोनपेठ शहर आणि 3 किमी परिसरात बुधवारी मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी वाढवण्यात आली. संचारबंदीच्या या काळात कुणीही रस्त्यावर विनाकारण फिरू नयेे, तसे आढळून आल्यास त्या लोकांवर दंडात्मक कारवाई सोबतच गुन्हे देखील दाखल होतील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, या संचारबंदीतूून अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, औषधे आणि इतर काही कार्यालये व सेवांना सूट देण्यात आली आहे. ज्यामध्ये विविध सेवाभावी संस्था, आरोग्य संदर्भातील सेवा, सर्व शासकीय कार्यालय व त्यांची वाहने, शासकीय व खासगी दवाखाने, वैद्यकीय दुकान, वैद्यकीय कर्मचारी व आपत्तकालीन सेवा, शासकीय निवारागृह व अन्न वाटप करणारे एनजीओं व त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाना घेतलेली वाहने व व्यक्ती, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांचे संपादक, प्रतिनिधी, वितरक, पेट्रोलपंप व गॅस वितरक, कर्मचारी व वाहने याांना सूट देेण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीयकृत बँकाना केवळ रास्तभाव दुकानदारांकडून चलनाद्वारे रोकड भरणा करण्यासाठी तर ग्रामीण भागातील बँकेसाठी रोकड घेवून जाणारी वाहने व दूध विक्रेत्यांना सकाळी 6 ते 9 या वेळात तर शेतकऱ्यांना विमा भरण्यासाठी ई-महासेवा केंद्रांना या संचारबंदीच्या काळात मुभा देण्यात आली आहे.