परभणी - गेल्या आठ महिन्यांपासून शाळा बंद असल्याने शाळा वाहन चालक आणि मालकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने त्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी येथील राणा एकता वाहनचालक संघटनेच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. मात्र, आज (गुरुवारी) उपोषणाच्या चौथ्या दिवशी देखील प्रशासनाने त्यांची दखल न घेतल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
परभणी शहरात 22 मार्च 2020 पासून कोविडच्या महामारीमुळे शाळा बंद आहेत. परिणामी शालेय वाहनांची चाकेदेखील बंद आहेत. ही चाकेच थांबल्याने चालकांच्या कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले आहे. गेली 8 महिने उपासमार घडत आहे. लॉकडाउनमुळे त्यांना इतर कामधंदेदेखील करता आले नाहीत. अनेकांच्या कुटुंबाची वाताहत झाली. काही कुटुंबाना स्थलांतर करावे लागले. अशा परिस्थितीत शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, म्हणून शाळा वाहन चालक-मालक संघटनेने यापूर्वीच प्रशासनाकडे निवेदन दिले होते.
हेही वाचा - शरद पवार होणार युपीएचे अध्यक्ष? राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण
प्रशासनाकडून दखल नाही
वाहनचालक सध्या हालाखीचे जीवन जगत आहेत. यापूर्वीदेखील संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. परंतु, यावर कोणतीही सकारात्मक कार्यवाही प्रशासनामार्फत करण्यात आली नाही. निदान शासनाकडून काही आर्थिक मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे घडले नाही. त्यामुळे या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून न्याय मिळवून द्यावा, यासाठी सर्व वाहनचालक व मालक आणि त्यांच्या कुटूंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषण सुरू केले आहे.
या मागण्या मांडण्यात आल्या
यावेळी उपोषणकर्त्यांनी बँकेचे कर्ज, कर्जाचे हप्ते पूर्णपणे माफ करावेत, नवीन वाहने घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, निर्वाहभत्ता देण्यात यावा, स्वस्त धान्य दुकानातून रेशन देण्यात यावे, मुला-मुलीची महाविद्यालयीन शुल्क माफ करावे, विद्यार्थ्यांची ने-आण करणारा कर्मचारी म्हणून शाळेत नियुक्त करावे, विद्यार्थी वाहतूक करताना 'सुरक्षा कवच' विमा मंजूर करावा, आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत. या मागण्या मंजूर होत नाहीत, तोपर्यंत हे उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार शाळा वाहन चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - "पवार युपीएचे अध्यक्ष झालेले आम्हाला आवडेल; तसा प्रस्ताव आल्यास आम्ही पाठिंबा देऊ"