परभणी- 'सामना' मधून मांडण्यात आलेली 'साईबाबा प्रगटले' ही भूमिका संपादक म्हणून संजय राऊत यांची वैयक्तिक आहे, शिवसेनेची नाही. अशी रोखठोक भूमिका आज शिवसेनेचेच खासदार संजय जाधव यांनी मांडली. तसेच शिर्डीकर साईबाबा जन्मस्थळावरून केवळ अर्थव्यवस्था ढासळण्याच्या भीतीपोटी वाद घालत आहेत. साईबाबांचा जन्म पाथरीत झाला नाही तर कुठे झाला? हे सिद्ध करावे. तसेच मुख्यमंत्र्यांनी देखील या विषयावर समिती नेमून 'दूध का दूध आणि पाणी का पाणी करावे', अशी मागणी संजय जाधव यांनी पाथरीत झालेल्या आमसभेत केली.
हेही वाचा- मद्यधुंद चालकामुळे उत्तर प्रदेशात डबल डेकर बस पलटली, १५ जखमी
सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना भेटून साईबाबा जन्मस्थळासंबंधी पुरावे त्यांच्यापुढे सादर करून त्यांना हे पटवून देण्याचा निर्णय या आमसभेत एकमुखाने घेतला. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील दौर्यावर पाथरी साईबाबांचे जन्मस्थळ असून पाथरीच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिल्याची घोषणा केली होती. त्याच वेळी याला आक्षेप घेत पाथरीला जन्मस्थळ म्हणू नये, अशी भूमिका शिर्डीकरांनी घेतली.
त्यानंतर हा वाद राज्यभर नव्हे तर देशभर गाजत आहे. या प्रकरणी शिर्डीकरांनी 'बंद' केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुंबईत बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पाथरीला तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करू, अशी भूमिका घेतल्याची माहिती शिर्डीच्या शिष्टमंडळाने दिली होती. मात्र, पाथरी येथील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने याला विरोध करत आमची जन्मभूमीच आहे, असे म्हणत आजची सर्वपक्षीय आमसभा आयोजित केली होती. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार बाबाजानी दुर्रानी, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार सुरेश वरपुडकर, माजी आमदार मोहन फड, मंदिर समितीचे अध्यक्ष सिताराम धानू, विश्वस्त संजय भुसारी, जिल्हा परिषद अध्यक्ष विटेकर, व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार जाधव, आमदार बाबजानी दुराणी, आमदार डॉ. राहुल पाटील आदींनी आपली रोखठोक भूमिका मांडली.