परभणी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेली रेल्वेसेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली. सुरुवातीला राज्यांतर्गत रेल्वे सेवेला प्रारंभ झाला होता. आता राज्या बाहेरील रेल्वे सेवांनादेखील सुरुवात झाली असून या अंतर्गत पूर्णा-पटना (बिहार) ही रेल्वे सेवा नियमित करण्यात आली आहे. ज्यामुळे लॉकडाऊनमध्ये आपल्या राज्यात परत गेलेला मजूरवर्ग पुन्हा एकदा कामावर परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या पूर्वी पूर्णा-पटना ही एक्स्प्रेस गाडी पूर्णा येथून दर शुक्रवारी (4, 11, 18 आणि 25 डिसेंबर) सुटणार होती. तसेच पटना-पूर्णा एक्स्प्रेस पटना येथून (6, 13, 20 आणि 27 डिसेंबर) ला सुटणार होती. परंतु यामध्ये बदल करण्यात आला आहे.
गाड्यांमध्ये दोन दिवस बदल -
गाडी संख्या 07610 पूर्णा ते पटना ही उत्सव विशेष गाडी 4 आणि 11 डिसेंबरला पूर्णा येथून आधी घोषित केल्यानुसार त्याच तारखेला सुटणार आहे. परंतु 18 डिसेंबर रोजी सुटणारी गाडी एक दिवस आधी म्हणजे 17 डिसेंबर रोजी सुटेल. तसेच 25 डिसेंबर रोजी सुटणारी गाडी 24 डिसेंबरला (गुरुवारी) सुटेल. म्हणजेच 17 आणि 24 डिसेंबरला गुरुवारी ही गाडी पूर्णा रेल्वे स्थानकावरून दुपारी 14.10 वाजता सुटेल. पुढे नांदेडला दुपारी 14.42, आदिलाबाद- 18.20, नागपूर- मध्यरात्री 00.25 आणि पटना येथे रात्री 23.20 वाजता पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासातही बदल -
गाडी संख्या 07609 पटना ते पूर्णा ही 6 डिसेंबर आणि 13 डिसेंबरला सुटणारी उत्सव विशेष गाडी आधी घोषित केल्यानुसार दर रविवारी पटना रेल्वे स्थानकावरून सकाळी 7.00 वाजता सुटणार आहे. परंतु 20 डिसेंबरला सुटणारी गाडी आता 19 डिसेंबरला आणि 27 डिसेंबरला सुटणारी गाडी 26 डिसेंबरला म्हणजे दर शनिवारी पटना रेल्वे स्थानकावरून सकाळी 7 वाजता सुटणार आहे. पुढे नागपूर येथे पहाटे 4.40 वाजता, तर आदिलाबाद - 11.05, नांदेड -11.42 मार्गे पूर्णा येथे दुपारी 15.25 वाजता पोहोचणार आहे. म्हणजेच 19 आणि 26 डिसेंबर ला शनिवारी ही गाडी पटना रेल्वे स्थानकावरून सकाळी 7.00 वाजता सुटेल आणि नागपूर- 4.40 आदिलाबाद- 11.05 , नांदेड- 11.42 मार्गे पूर्णा येथे दुपारी 15.25 वाजता पोहोचेल.
मजूर वर्गाला दिलासा -
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ राज्यांतर्गत रेल्वेला सुरुवातीला परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विशेष रेल्वेगाड्यांच्या नावाने आंतरराज्य रेल्वे गाड्यांना देखील परवानगी देण्यात आली. ज्यामध्ये मराठवाड्यातून पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि अन्य काही राज्यांना जोडणाऱ्या रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे मराठवाड्यातून आपल्या राज्यात परतलेला मजूरवर्ग पुन्हा एकदा कामावर परतू लागला आहे. शिवाय त्या ठिकाणी काम करणारा मराठवाड्यातील मजूरदेखील आपल्या कामावर रुजू होण्यासाठी तयार झाल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - महापरिनिर्वाण दिन : चैत्यभूमीवर गर्दी करू नका, महापौरांचे आवाहन