परभणी - काँग्रेसने दिलेली ४ जागांची ऑफर धुडकावत वंचित बहुजन आघाडीने मराठवाड्यातील लोकसभेच्या चार जागेवरील उमेदवार जाहीर केले. आज परभणीतील सभेत प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यावेळी त्यांनी ४ जागांची ऑफर देणाऱ्या काँग्रेसला 'तुम्ही आम्हाला काय चार जागा देणार, आमच्या सोबत या आम्ही तुम्हाला चार जागा देतो. मुकाट्याने घ्या नाही तर तुमची फजिती होईल, असा टोला लगावला.
मराठवाड्यातील चार उमेदवार जाहीर -
दरम्यान, सभेच्या सुरुवातीलाच प्रकाश प्रकाश आंबेडकरांनी मराठवाड्यातील ४ लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने उभ्या राहणाऱ्या उमेदवारांची नावे घोषीत केली. यामध्ये औरंगाबाद लोकसभेसाठी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, बीडसाठी कैकाडी समाजाचे नेते प्रा. विष्णू जाधव, उस्मानाबाद धनगर समाजाचे नेते अरुण सलगर, जालना लोकसभेसाठी विश्वकर्मा समाजाचे शरदचंद्र वानखेडे यांचे नाव जाहीर केले आहे. दरम्यान, परभणी आणि हिंगोली लोकसभेच्या उमेदवारांची नावे २३ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या सभेच्या व्यासपीठावर माजी आमदार लक्ष्मण माने, धनगर समाजाचे नेते खरात, एमआयएम व इतर बहुजन समाजाचे नेते आणि परभणी, नांदेड व औरंगाबाद येथील पदाधिकारी उपस्थित होते.