परभणी - कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला आहे. परिणामी जून महिन्यात सुरू होणाऱ्या शाळा अजूनही प्रत्यक्षात सुरू झालेल्या नाहीत. परंतू अनेक शाळांनी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असलेला स्मार्ट फोन, गरीब शेतकरी आणि शेत मजुरांच्या खिशाला परवडणारा नाही. परिणामी अनेकांची मुलं सध्या शिक्षण सोडून शेती कामात जुंपलेली दिसून येत आहेत.
खरीपाचा हंगाम सुरू असल्याने, परभणी जिल्ह्यात शेतीच्या कामाचा वेग वाढला आहे. मात्र या शेतांमध्ये शेतकऱ्यांसोबत त्यांची मुलं देखील राबताना दिसून येत आहेत. कारण सध्या लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या नसल्या तरी ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांकडून शिकवणी घेतल्या जात आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असलेला स्मार्टफोन उपलब्ध नसल्याने हे विद्यार्थी अभ्यास सोडून आई-वडिलांना शेतीच्या कामांमध्ये मदत करताना पाहायला मिळत आहेत. या संदर्भात परभणी तालुक्यातील नांदापूर आणि पेडगाव शिवारात शेतांवर जाऊन 'ईटीव्ही भारत'ने प्रत्यक्ष पाहणी केली असता, अनेक शेतांमध्ये शेतकऱ्यांची तसेच शेत मजूरांची मुलं देखील आपल्या आई-वडिलांसोबत शेतांमध्ये काम करताना आढळून आली.
पेडगाव शिवारातील एका शेतात काम करणारा शेतमजूर रामभाऊ सपाटे यांना मुलांच्या शिक्षणाबाबत विचारले असता, त्यांनी स्मार्ट मोबाईल घेऊ शकत नसल्याची मजबूरी व्यक्त केली. ते म्हणाले, 'साहेब कशाची शाळा आली, शिक्षक मुलांना मोठा मोबाईल घेऊन द्या, म्हणून सांगतात. पण त्याच्यासाठी पैसे कुठून आणायचे? आमची मुलं एरवी शाळेत जात होती. मात्र आता कोरोनामुळे शाळा बंद झाली. ऑनलाइन शाळेसाठी मोबाईल नाही म्हणून आमची मुलं आमच्या सोबत शेतात कामाला येतात. आमच्या सोबतच काम करून पाच-पन्नास रुपये कमवतात. तेवढाच आमच्या घराला हातभार लागतो. लॉकडाऊनमध्ये सध्या आमच्या हाताला पण म्हणावं तसं काम नाही. त्यामुळं काम मिळेलं, तिथं मुलांना ही सोबत घेवून जातोय.'
या संदर्भात काही विद्यार्थ्यांनी देखील माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 'शिक्षक मोबाईल घ्या म्हणून मागे लागत आहेत, पण आमचे वडिल गरीब आहेत. ते मोबाईल घेऊ शकत नसल्याने आमचा ऑनलाईन अभ्यास होत नाही. शाळेतून पुस्तके मिळाली. पण ती शिकायला मोबाईल पाहिजे. पण आई-वडिल मोबाईल घेऊन देत नाहीत, म्हणून आमचा अभ्यास सध्या होत नाही. त्यामुळे आम्ही वडिलांसोबत शेतात येऊन काम करतो. 50 ते 100 रुपये आम्हाला दिवसाकाठी मिळतात, ते आम्ही आमच्या आई वडिलांना देतोय.'
एकूणच काय तर.. लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू झाली. मात्र प्रत्यक्षात ती सर्वांनाच परवडणारी नाही, याचा विचार करायला कोणीच तयार नाही. शहरी भागात मजूरदार वर्गाचे विद्यार्थी मोबाईल नसल्याने शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील गरीब शेतकरी आणि शेतमजुरांची देखील हीच परिस्थिती झाली आहे. आता प्रशासन आणि शासनानेच या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काहीतरी मार्ग काढणे आवश्यक आहे, अशी भावना सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
हेही वाचा - मुलाचा शाही विवाह उद्योजकाला पडला महागात; भरावा लागणार 40 कोरोनाबधितांचा खर्च
हेही वाचा - भाजपचे माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा परभणीत दुचाकी अपघातात मृत्यू