परभणी - जिल्ह्यात गेल्यात काही दिवसात सातत्याने गावठी पिस्तूल जप्त होत आहेत. गेल्या 4 दिवसात सलग तिसऱ्यांदा पोलिसांनी गावठी पिस्तूल जप्त करून काही पिस्तूल माफियांना अटक केली आहे. सातत्याने होणार्या कारवायांमुळे परभणी जिल्ह्यात पिस्तूल माफीया मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. या कारवायांच्या माध्यमातून गावठी पिस्तुल खरेदी-विक्री करणार्यांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
एका पिस्तूलासह 2 आरोपी अटक -
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे नागापुर (ता जि परभणी) येथे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. नागापुर येथील या ईसमाने गावठी पिस्तूल (अग्नीशस्त्र) घरात लपवुन ठेवल्याची माहीती गुप्त बातमीदाराने दिल्यानंतर पोलीसांनी शुक्रवारी रात्री छापा मारला असता, गावातील सतीश नामदेव कुरवळे यांच्या ताब्यातुन एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. त्याने हे पिस्तूल शेख गफार शे अब्दुल (रा.भिमनगर परभणी) यांचेकडुन विकत घेतल्याचे सांगितले. त्यावरुन शेख अब्दुल याचा शोध घेवुन त्याला देखील पोलिसांनी अटक केली. त्याने देखील हे पिस्तूल शेख सोनु उर्फे अमीर शेख ताहेर (रा.रमाबाई नगर, परभणी) यांचेकडुन विकत घेतल्याचे सांगितले. या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री नोंद करण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरु आहे.
शेख सोनूकडून यापूर्वी 2 पिस्तूल, 13 कडतूस, चरस-गांजा जप्त -
शुक्रवारी रात्री जप्त करण्यात आलेले पिस्तूल आरोपीने परभणीच्या साखला प्लॉट भागातील रेल्वे गेट जवळ राहणाऱ्या शेख सोनू उर्फ शेख आमीर शेख ताहेरयांच्याकडून खरेदी केले आहे. शेख सोनू हा चरस-गांजाचा व्यवसाय करतो. तो सोबत बंदूक (पिस्टल) वापरतो आणि शहरातील काही गुंड टोळ्यांना शस्त्र आणून विकत असल्याचीही माहिती यापूर्वीच पोलिसांना मिळाल्याने त्याच्या अड्ड्यावर मंगळवारी उशिरा छापा टाकला होता. त्यात 60 हजार रुपये किंमतीचे 111 ग्रॅम चरस, 500 ग्रॅम गांजा चारचाकी वाहनातून 1 पीस्तूल, 13 जीवंत काडतूस मिळाले आहेत. बुलेट गाडीच्या डिक्कीतून आणखी एक गावठी पिस्तूल जप्त केले. त्या कारवाईत तीन आरोपी अटक करून करून एकूण 6 लाख 41 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पिस्तूल खरेदी-विक्री करणारे मोठे रॉकेट -
शेख सोनू यांच्यावरील कारवाईच्या दुसऱ्या दिवशी (बुधवारी) पाथरी येथे देखील एका व्यक्तीकडून गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. त्याला देखील अटक करण्यात आली असून, त्याने सुद्धा परभणीतूनच पिस्तूल खरेदी केल्याचे तपासात पुढे आले. त्यानंतर काल (शुक्रवारी) रात्री पुन्हा एक पिस्तूल जप्त करण्यात आले. ज्यामुळे आता या कारवाईत गावठी पिस्तूल खरेदी-विक्री करणारे मोठे रॉकेटच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यांनी केली कारवाई -
ही कारवाही सहाय्यक पोलीस अधिक्षक अविनाश कुमार, सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, फौजदार चंद्रकांत पवार, विश्वास खोले, पोलीस कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, शंकर गायकवाड, गणेश कोटकर, यशवंत वाघमारे, विष्णु भिसे, अजहर पटेल, दिपक मुदिराज, अरुण कांबळे, सुधीर काळे यांनी केली. गेल्या काही दिवसात जिल्ह्यात अवैद्य शस्त्रास्त्रे मोठ्या प्रमाणात मिळून येत आहेत. त्यामुळे पोलील अधिक्षक जयंत मीना, अपर पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी 'कोणत्याही प्रकाराच्या अवैध धंदयाबाबत, शस्त्रास्त्रे आदींसंदर्भात माहीती असल्यास पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या (९६७३८८८८६८) या मोबाईल क्रमांकावर माहीती दयावी. माहीती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन केले आहे.