परभणी - राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या मात्र सध्या पॅरोलवर बाहेर सुटून आलेल्या आरोपी सोबतचा फोटो समाजमाध्यमांमध्ये जोरदार व्हायरल होत आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाप्रसंगी देवेंद्र फडणवीस आले असता, या आरोपीने चक्क त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केल्याचा तो फोटो आहे. याबद्दल आता विरोधकांमधून जोरदार टीका होताना दिसून येत आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही फोटो व्हायरल -
दोनच दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत काही गुन्हेगारांचे फोटो समाज माध्यमांमध्ये तसेच माध्यमांमध्ये आल्यानंतर वादंग उठले होते. यावरून भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली होती. हे वादळ शांत होत नाही, तोच भाजपच्या प्रमुख नेत्यासोबतच आता एका आरोपीचा फोटो व्हायरल झाल्याने राष्ट्रवादीला टीका करण्याची संधी मिळाली आहे.
'आरोपी गोविंद थिटेवर आहे खुनाचा गुन्हा -
गोविंद थिटे असे या आरोपीचे नाव आहे. जिंतूर तालुक्यातील वरूड येथील एका युवकाच्या खून प्रकरणात तो कारागृहात असून, तो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पॅरोलवर बाहेर आला आहे. 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस हिंगोली जिल्ह्यातील एका कार्यक्रमासाठी आले असता, परत जाताना जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या एका कार्यकर्त्याच्या पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाला ते हजर राहिले. या ठिकाणी त्यांनी फीत कापून पेट्रोल पंपाचे उद्घाटन केले. यानंतर त्यांचे छोटेखानी भाषण देखील या ठिकाणी झाले. शिवाय अनेकांनी त्यांचे स्वागत, सत्कार केले. यामध्ये गोविंद तिथे या आरोपीने देखील त्यांना भलामोठा पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केल्याचे फोटो आता समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले आहेत. ग्रहमंत्री अनिल देशमुख यांच्या व्हायरल फोटोनंतर आता विरोधकांचा देखील अशाच पद्धतीचा फोटो व्हायरल झाल्याने राष्ट्रवादी आणि भाजपचे पदाधिकारी आणि नेते एकमेकांवर कुरघोडी करत आहेत की काय ? असेच यातून आता दिसून येत आहे.