परभणी - इंधनाच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात राज्यातील सर्वाधिक दर परभणीत असून, या उच्चांकी दरामुळे वाहनधारक संताप व्यक्त करत आहेत. परभणीत पॉवर पेट्रोल तब्बल 111.70 रुपये तर साधे पेट्रोल 108.19 पैसे प्रति लिटर एवढ्या दराने विक्री होत आहे. तसेच डिझेलसुद्धा (97.62 रुपये) शंभरीच्या अगदी जवळ पोहचले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात पेट्रोल 27.28 तर डिझेल 28.9 रुपयांनी महागले आहे. ज्याचा परिणाम परभणी जिल्ह्यातील महागाईवर झाल्याचे दिसून येत आहे.
'जगात जर्मनी आणि भारतात परभणी' या म्हणीप्रमाणे परभणी इंधनाच्या रेकॉर्डब्रेक किंमतीमुळे नेहमी प्रमाणे चर्चेत असते. परभणीत दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या इंधनाच्या किंमतीची घोडदौड कायम आहे. राज्यातील सर्वात महाग पेट्रोल सध्या परभणीकारांना घ्यावे लागत आहे. परभणी शहरात सोमवारी (दि. 5 जुलै) पावर पेट्रोल तब्बल 111 रुपये 70 पैसे प्रति लिटर दराने विक्री होत आहे. तर साधे पेट्रोल 108.19 पैसे दराने विकल्या जात आहे. तसेच डिझेलच्या दराचाही भडका उडाला असून, डिझेल 97.62 पैसे प्रतिलिटर प्रमाणे परभणीकर खरेदी करत असल्याने तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
वर्षभरात पेट्रोल 27.28 रुपयांनी महागले
विशेष म्हणजे गतवर्षी जून महिन्यातच परभणीत पेट्रोलचे दर 80 रुपये 96 पैसे प्रति लिटर एवढे होते, तर डिसेंबरमध्ये अर्थात सहा महिन्यांपूर्वी 92.4 रुपये आणि तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच मार्च महिन्यात 96 रुपये 66 पैसे आणि मे महिन्यात 99 रुपये 74 पैसे प्रति लिटर दराने विक्री झाले आहे. त्यानंतर जून महिन्यात हा दर शंभरीच्या वर गेला. तसेच रविवारी (4 जुलै) 107.86 पैसे प्रति लिटर झाला, तर सोमवारी (दि. 5 जुलै) त्यात 33 पैशांची वाढ झाली असून, 108 रुपये 19 पैसे प्रति लिटर दराने पेट्रोल ग्राहकांना खरेदी करावे लागत आहे.
डिझेलमध्ये 28.9 रुपयांची वाढ
पेट्रोलप्रमाणे डिझेलही आता शंभरीच्या वाटेवर आहे. डिझेलमध्येही गेल्या वर्षभरात तब्बल 28.9 रुपयांची वाढ झाली आहे. गतवर्षी जून महिन्यात परभणीत डिझेल 69 रुपये 58 पैसे तर सहा महिन्यांपूर्वी डिसेंबर महिन्यात 81 रुपये 29 पैसे एवढ्या दराने विक्री झाले. शिवाय तीन महिन्यापूर्वी मार्च महिन्यात 89.26 तर मे महिन्यात 89 रुपये 45 पैसे एवढा झाला. यात पुन्हा वाढ होऊन रविवारी (दि. 4 जुलै) 97.62 पैसे एवढ्या दराने डिझेलची विक्री झाली. मात्र, आज (सोमवारी) त्यात वाढ झाली नसून 97.62 पैसे प्रति लिटर दराने विक्री होत आहे.
हा अन्याय आमच्यावरच का ?
गेल्या काही दिवसात देशात इंधनाचे भाव झपाट्याने वाढत आहेत. मात्र, त्यातील सर्वाधिक भाव परभणीत असल्याने हा आन्याय आमच्यावरच का, असा सवाल वाहनधारक उपस्थित करू लागले आहेत. सध्या निर्बंध लागू आहेत. लोकांना आधीच रोजगार नाही, त्यात इंधन दरवाढीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सहन करावी लागत आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
वाहतूक महागली; महागाई वाढली
बहुतांश प्रवासी आणि मालवाहू ऑटोरिक्षा, टेम्पो, ट्रक हे डिझेलवर चालतात. त्यामुळे प्रवासी वाहतुकी बरोबरच माल वाहतुकीचा खर्च वाढला आहे. वाहतूक, दळणवळण, व्यापार व प्रवास या सर्वावर याचा विपरीत परिणाम झाला आहे. ज्यामुळे भाजीपाला, धान्य व अन्य दैनंदिन वस्तूंची दरवाढ झाली आहे. विशेषतः खासगी प्रवास महागला आहे. हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही. त्यामुळे इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी होत आहे.
परभणीतील सर्वाधिक दराचे कारण
परभणी जिह्यातील भारत पेट्रोलियमच्या पंपाना 330 किमी दूर असलेल्या मनमाड डेपोतून इंधन पुरवठा होतो. तर हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपाना सोलापूर येथून पुरवठा केला जातो. या ठिकाणाहून इंधन आणण्यासाठी वाहतूक खर्च मोठा लागतो. परिणामी पेट्रोल व डिझेलच्या किंमती वाढतात. त्यामुळे परभणी परिसरात किंवा जवळ असलेल्या एखाद्या मोठ्या शहरात इंधनाचा डेपो उभारावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, याकडे शासन आणि प्रशासन या दोन्ही बाजूंनी दुर्लक्षच होत असते.
हेही वाचा - 'मोदी सरकारने करून दाखवले, इंधन दरवाढ रोखण्यास अपयशी ठरले'