परभणी - सोमवारी मुंबईत जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत पार पडली. यात परभणीचे अध्यक्षपद खुल्या गटातील महिलेला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे विद्यमान अध्यक्ष महिलाच असून पुन्हा पुढचे अडीच वर्ष देखील महिलेला संधी मिळणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेत यावेळी 'महाशिवआघाडी'चा प्रयोग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु, असे असले तरी महापालिकेवर राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांचे वर्चस्व असल्याने त्यांच्या समर्थकालच पुन्हा संधी मिळेल, असेही सांगण्यात येते.
हेही वाचा - परभणीच्या महापौरपदासाठी चार; तर उपमहापौर पदासाठी पाच अर्ज, काँग्रेसचे पारडे जड
परभणी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक 24 सदस्य असून त्यापाठोपाठ शिवसेनेचे 13, काँग्रेसचे 6, भाजपचे 5, रासपचे 3 तर अपक्ष 3 सदस्य आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता असून मागच्या अडीच वर्षात राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, आता राज्यातील राजकीय परिस्थिती बदलण्याच्या मार्गावर आहे. राज्य शासनच महाशिवआघाडीचे होणार असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत या ठिकाणच्या जिल्हा परिषदेत देखील भाजपला बाजूला ठेवून राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची संयुक्त सत्ता स्थापन होण्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे मागच्या अडीच वर्षात भाजपला याठिकाणी सभापतीपद मिळाले आहे. मात्र, आता त्यांना दूर ठेवून सत्ता निर्माण करणार असल्याचे बोलले जाते. असे असले तरी बऱ्याच वेळी वरच्या परिस्थितीच्या विरुद्ध स्थानिक परिस्थिती असते. मागच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसला दूर ठेवले होते. तर आता या ठिकाणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन एका विचाराने अध्यक्षपदाची माळ माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांची आई निर्मलाबाई विटेकर यांच्या गळ्यात टाकू शकतात.
हेही वाचा - परभणीत तीन अट्टल दरोडेखोर गजाआड
प्रत्यक्षात मात्र जिल्हा परिषदेच्या राजकारणात गेल्या काही वर्षात माजी आमदार विजय भांबळे यांनी वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांच्या मर्जीतला तसेच जिंतूर तालुक्यातला अध्यक्ष पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर दिसू शकतो. यावेळी खुल्या गटातील महिला उमेदवाराला आरक्षण मिळाल्याने प्रत्येक गटाकडे उमेदवाराची उपलब्धता आहे. त्यामुळे भांबळे गटातील शालिनीताई राऊत दुधगावकर यांची या पदावर वर्णी लागू शकते, असे सांगितले जाते. तर दुसरीकडे अन्य काही उमेदवार देखील गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत.तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दुरानी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर आणि विजय भांबळे यांच्या समन्वयातून व वरिष्ठांच्या मर्जीने नवीन अध्यक्षाची निवड होईल, हे मात्र निश्चित आहे.
शिवसेनेलाही सत्तेत वाटा -
महाशिवआघाडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमध्ये यावेळी शिवसेना सत्तेत सहभागी होईल, आणि दुसरीकडे भाजपला मिळालेले सभापतीपद सेना आपल्या ताब्यात घेऊ शकते, अशी परिस्थिती आहे. मात्र, या सर्व शक्यता असल्या तरी स्थानिक नेत्यांमधील वाद-प्रतिवाद यावरच पुढील परिस्थिती अवलंबून आहे, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.