परभणी - शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्यावर ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहेत. भरोसे यांनी काही दिवसांपूर्वी राहुल पाटील यांना चोर आणि गद्दाराची उपमा दिली होती. त्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
आनंद भरोसे यांनी आधी पंचायत समितीची निवडणूक जिंकून दाखवावी आणि मग आमदारासारख्या व्यक्तीवर आरोप करावेत, अशी टीकाही शिवसेनेने केली. यासंदर्भात शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर व माजी जिल्हाप्रमुख तथा जि. प. सदस्य गंगाप्रसाद आनेराव यांच्यासह परभणी विधानसभात मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने मंगळवारी ही पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी बोलताना नावंदर म्हणाले, प्रत्येक मतदारसंघातल्या आमदारांना काही संवैधानिक अधिकार असतात. त्यानुसारच ते विकासकामांचे उद्घाटन करतात. तेव्हा त्यांना चोर म्हणणे योग्य नाही, याबद्दल आम्ही आनंद भरोसे यांचा निषेध करतो. आनंद भरोसे यांना हे शोभणारे नसून त्यांनी बोलण्यापूर्वी विचार करायला हवा होता.
गंगाप्रसाद आनेराव यांनीही अत्यंत तिखट शब्दात आनंद भरोसे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ज्यांची लायकी पंचायत समितीला निवडून यायची नाही, ते आमदारासारख्या व्यक्तिमत्त्वावर आरोप करत आहेत. विशेष म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या ४ तास आधी भाजपमध्ये आलेले आनंद भरोसे हे काँग्रेसचे बांडगुळ आहेत. येणाऱ्या काळात ते जर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार झाले तर आश्चर्य वाटायला नको. काँग्रेस विचारसरणीच्या आनंद भरोसे यांना भाजप-शिवसेना युतीशी काही घेणे देणे नाही त्यांना युतीची संस्कृतीच माहीत नाही, त्यामुळे ते अशा प्रकारची बडबड करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
आनंद भरोसे यांच्या बेताल वक्तव्याबद्दल आमदार राहुल पाटील यांच्या वतीने ५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात येणार आहे. शिवाय भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडे देखील आनंद भरोसे यांची तक्रार करण्यात येणार असल्याचे आनेराव यांनी शेवटी सांगितले.