परभणी - शहरातील माळी गल्ली या मध्यवस्तीतील भागातून आज (बुधवारी) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल 3 लाख 70 हजार रुपयांचा गुटख्याचा अवैद्य साठा जप्त केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली असून ही कारवाई पहाटे साडेपाचच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांना मिळाली होती टीप -
याप्रकरणी पोलिसांना खबऱ्याकडून टीप मिळाली होती. त्याप्रमाणे माळी गल्लीत एका व्यक्तीने त्याच्या घरात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधी सुपारीचा मोठा साठा बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने साठवला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार चंद्रकांत पवार, फौजदार विश्वास खोले यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना, अतिरीक्त पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना सांगितल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले.
यांनी टाकला छापा -
वरिष्ठांच्या आदेशानुसार परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार चंद्रकांत पवार, फौजदार विश्वास खोले, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, अजहर पटेल, शंकर गायकवाड, विष्णू भिसे, दीपक मुदीराज, यशवंत वाघमारे, अरुण कांबळे आदींच्या पथकाने आज (बुधवारी) पहाटे साडेपाचच्या सुमारास माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तेथे प्रतिबंधित गुटख्यासह सुगंधी सुपारीचा मोठा साठा पथकाने जप्त केला. या कारवाईत पथकाने एकास ताब्यात घेतले. या साठ्याची मोजदाद करण्यात आली. 3 लाख 70 हजार 35 रुपयांचा तो साठा असल्याचे नानलपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.