परभणी - लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बंद झालेल्या रेल्वे गाड्या आता टप्याटप्याने सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने पाऊल उचलले आहे. सध्या सुरू असलेल्या अंतर राज्य गाड्यांशिवाय राज्या अंतर्गत गाड्यांना परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये परभणी-हैदराबाद ही गाडी १२ सप्टेंबर पासून नांदेड, निजामाबादमार्गे धावणार आहे.
देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात गेल्या काही महिन्यांपासून पूर्णतः बंद केलेल्या रेल्वेगाड्या हळूहळू सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली आहे. त्यात रेल्वे मंत्रालयाने शनिवारी देशभरातील एकूण ८० रेल्वेगाड्या १२ सप्टेंबरपासून सुरू होतील, असे जाहीर केले आहे. त्यामध्ये दक्षिण मध्य रेल्वे विभागातंर्गत परभणी ते हैद्राबाद (०७५६४) व हैद्राबाद ते परभणी (०७५६३) ही एक्सप्रेस विशेष गाडी म्हणून दररोज नांदेड मार्गे धावणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार १२ सप्टेंबर पासून परभणी-हैदराबाद-परभणी ही विशेष एक्स्प्रेस रेल्वे गाडी सुरू करण्यात येत आहे. ही गाडी (०७५६४) परभणी येथून दररोज रात्री २२.३० वाजता सुटेल आणि नांदेड मार्गे हैदराबाद येथे दुसर्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ही गाडी (०७५६३) हैदराबाद येथुन रोज रात्री २२.४५ वाजता सुटेल आणि निजामाबाद मार्गे परभणी येथे सकाळी ६.३० वाजता पोहोचणार आहे. या विशेष गाडीला जाताना व येताना देखील पूर्णा, नांदेड, मुदखेड, निझामाबाद, कामारेड्डी, सिकंदराबाद या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे एकूण १५ डब्यांची ही गाडी पूर्णपणे आरक्षित असेल. ज्यात ७ सर्वसाधारण स्लीपर कोच, एकूण ६ एसी आणि २ एसएलआर डब्बे असतील, या गाडीचे आरक्षण १० सप्टेंबर पासून सुरू होईल, अशीही माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.