परभणी - विमा कंपन्यांकडून विमा नाकारण्याचे प्रमाण आणि अपुरा विमा याविषयी शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त होते. जिल्ह्यातील शेतकऱ्याने थेट ग्राहक मंचात जावून तक्रार केली. त्यावर निकाल देताना जिल्हा ग्राहक मंचाने विमा नाकारणाऱ्या भारतीय कृषि विमा कंपनीला दणका दिला आहे. शेतकऱ्याला ३० दिवसांच्या आत नुकसान भरपाई देवून खर्च आणि मानसिक त्रासाबद्दल रोख रक्कम देण्याचे ग्राहक मंचाने आदेश दिले आहेत.
राज्यात २०१५-१६ मध्ये भयंकर दुष्काळ असतानाही शेतकऱ्याला भारतीय कृषि विमा कंपनीने विमा नाकारला होता. भरपाईचे आदेश देण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाल आहे. तसेच क्षुल्लक कारणांवरून विमा भरपाई नाकारणाऱ्या कंपन्यांनासुद्धा हा एक प्रकारचा दणका आहे.
दुष्काळातही विमा कंपनीने भरपाई देण्यास केली टाळाटाळ-
भारतीय कृषि विमा कंपनीने ऊसाच्या नुकसान भरपाईची रक्कम दिली नसल्याची तक्रार म्हाळसा सावंगी येथील शेतकऱ्यांनी परभणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे केली होती. यातील शेतकरी विजय चव्हाण व कुणाल चव्हाण यांनी २०१५-१६ मध्ये प्रत्येकी १ हेक्टर क्षेत्रावर आडसाली उसाची लागवड केली होती. त्या पिकाचा विमा भारतीय कृषि विमा कंपनीकडे काढला होत. मात्र २०१५-१६ मध्ये मराठवाडयात भयंकर दुष्काळ पडला. पाऊस न झाल्याने पाण्याचे सर्व स्त्रोत आटले. यात मराठवाड्यातील शेतकऱ्यांची सर्व पिके वाळून गेली. अनेक शेतकऱ्यांना पेरण्या करता आल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठलेही पिक हाती लागले नाही. असे असताना विमा कंपनीने चव्हाण यांना कुठलीही नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे त्यांनी अॅड. साहेबराव अडकिणे यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक मंचात धाव घेतली.
भारतीय कृषि विमा कंपनीने वेगवेगळी कारणे दर्शवून हे शेतकरी नुकसान भरपाईस पात्र नाहीत, असा युक्तीवाद केला. परंतु तक्रारदाराच्यावतीने अॅड अडकीने यांनी विमा कंपनीने नोंदवलेल्या प्रत्येक आक्षेपावर सविस्तर विवेचन केले. त्यांनी शेतकरी नुकसान भरपाईस पात्र असल्याचे ग्राहक मंचाच्या निदर्शनास आणून दिले. मंचानेदेखील दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून प्रत्येक शेतकऱ्याला १ लाख रुपये नुकसान भरपाई, खर्चापोटी २ हजार रुपये तर मानसिक त्रासापोटी २ हजार रुपये ३० दिवसाचे शेतकऱ्यांना देण्याचे आदेश दिले. तसेच ३० दिवसांत रक्कम अदा न केल्यास त्यास ७ टक्के व्याज देण्याचे आदेशसुद्धा दिले आहेत.
अर्जदार शेतकऱ्याच्या वतीने अॅड. साहेबराव अडकिणे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. सविता अडकिणे, अॅड. हरीदास जाधव, अॅड. सुभाष मोरे यांनी सहकार्य केले.