परभणी - मनात प्रखर इच्छाशक्ती असेल तर काहीही साध्य करता येते, याची प्रचिती परभणीच्या लता पांचाळ हिने घडवली. अंध असणाऱ्या लताने महाराष्ट्रातील सर्वात उंच व चढाईला अतिशय कठीण मानले जाणारे कळसुबाई हे तब्बल 5 हजार 400 मीटरचे शिखर सर करत एक वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे. परभणीतील पुर्णा तालुक्याच्या देऊळगाव दुधाटे येथील रहिवासी असलेल्या लताने नववर्षाच्या पुर्वसंध्येला ही मोहिम फत्ते केली.
शिवार्जुन प्रतिष्ठानकडून दरवर्षी दिव्यांग युवक-युवतींना कळसुबाई शिखर करण्याची मोहिम आखून प्रोत्साहित केले जाते. यावर्षी प्रतिष्ठानच्या वतीने राज्यातील 20 जिल्ह्यांतील 70 दिव्यांग युवांना 30 डिसेंबरच्या मध्यरात्री सह्याद्री पायथ्याशी असलेल्या जाहिंगीरदारवाडी गावात एकत्र आणण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी मोहिमेला सुरुवात झाली.
'एकमेकांचे मनोबल वाढवत शिखर केला सर -
या मोहिमेत लता पांचाळ आपल्या काही मैंत्रिणींच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाली होती. कोणताही नकारात्मक विचार तिच्या मनाला शिवला नाही. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय, कळसूबाई माता की जय, हर हर महादेव' अशा घोषणा देत इतर दिव्यांगासोबत लताने शिखर चढाईसाठी कूच केली. या मोहिमेत सहभागी दिव्यांग एकमेकांना आधार देत एकमेकांचे मनोबल वाढवत होते. कळसुबाई शिखर सर करताना शेवटी येणाऱ्या चार लोखंडी शिड्या लताने मोठ्या जिद्दीने पार केल्या.
'प्रमाणपत्र, पदक देवून केले सन्मानित -
नववर्षाच्या पुर्वसंध्येला लताने हे शिखर सर केले. शिखराचा माथा गाठल्यावर सर्वांनी कडाक्याच्या थंडीत तंबूमध्ये मुक्काम केला. नववर्षाच्या पहाटे सह्याद्री पर्वताच्या माथ्यावर असलेल्या कळसुबाई मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. तसेच उगवत्या सुर्याला नमस्कार करुन सकाळी 10 वाजता परतीची वाट धरत खाली उतरण्यास सुरुवात केली. शिखरावरुन खाली उतरताना काळजीपुर्वक पावले टाकावी लागत होती. कारण संपूर्ण वाट निसरडी होती, असे लताने सांगितले. मोहिमेत सहभागी सर्व दिव्यांगांना शिवुर्जान प्रतिष्ठानच्या वतीने प्रमाणपत्र व पदक देवून सन्मानित करण्यात आले.
अंध असूनही एकट्याने प्रवास करते लता -
जन्मत: दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या लताला मामा प्रभाकर यांच्या आग्रहामुळे नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंग माध्यमिक अंध विद्यालयात पहिली ते आठवीपर्यंत दिव्यांगासाठीचे विशेष शिक्षण घेता आले. त्यानंतर तिने बारापीपर्यंतचे शिक्षण नांदेडला राहूनच पूर्ण केले. नंतर पुढच्या शिक्षणाासाठी तिने पुणे गाठले. एस.पी.कॉलेजमधून बी.ए. केले असून, सध्या ती पुण्यातील आकुर्डी भागात रामकृष्ण मोरे महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयात एम.ए.करीत आहे. विशेष म्हणजे ती एकटीनेच प्रवास करते. गावाकडे वडील सुतारकीचा पारंपारिक व्यवसाय करतात. आई गृहिणी असून लताला दोन विवाहित बहिणी व एक भाऊ आहे. सर्वात लहान असलेली लता कुटुंबीयांची लाडकी आहे.
दोन वर्षांपूर्वी केला होता प्रतापगड सर -
महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कळसुबाई शिखराला गिर्यारोहकांच्या दृष्टीने आगळेवेगळे महत्त्व आहे. गिर्यारोहणाच्या अनेक मोठ्या मोहिमांपूर्वी गिर्यारोहक कळसुबाई सर करण्याचा सराव करतात. अत्यंत आव्हानात्मक मानले जाणारे हे शिखर चढण्यापूर्वी अनेक दिवस सराव करावा लागतो. 5 ते 6 तासांच्या मोहिमेत लताने कळसुबाई शिखर सर करण्याबरोबरच परतीचा प्रवास पूर्ण करत आपल्या शारिरिक व मानसिक क्षमतेचा परिचय करून दिला आहे. 2018 साली पुण्यात इतर मैंत्रिणींकडून ट्रेकींगबद्दल ऐकल्याने लताची उत्सुकता वाढली. इतर मुली करु शकतात मग आपण का करु शकत नाही? या जिद्दीने तिने दोन वर्षापूर्वी प्रतापगड सर केला. महत्त्वाचे म्हणजे ज्या लताला दोन पावले चालायला त्रास व्हायचा तीच लता आज ट्रेकिंग करत आहे. तिला लहानपणापासून नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे. नवीन वर्षानिमित्त अंध मुला-मुलींसाठी आयोजित केलेल्या कळसुबाई शिखर मोहिमेत सहभागी होण्याचा लताने निर्धार केला आणि हे शिखर सर केल्याने आत्मविश्वास दुणावला आहे.
हेही वाचा - राज्यात 3 हजार 160 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 29 रुग्णांचा मृत्यू