परभणी - 'एक भूल कमल का फूल' असे सध्या म्हटले जात आहे. त्यातच, अशा भाजपला परभणीतील शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. शिवाय गेल्या पाच-पंचवीस वर्षांपासून ते करत असलेल्या जाती-धर्माचे राजकारण आता मागे पडले आहे. आता जनताही विकासाला महत्त्व देऊ लागली आहे. त्यामुळे परभणीत आमची लढाई राष्ट्रवादीशीच होईल, असा दावा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कांगो यांनी केला.
परभणी लोकसभा मतदारसंघात भाकपच्या वतीने कॉम्रेड राजन क्षीरसागर हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ परभणीत आलेले भालचंद्र कांगो पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले, परभणी लोकसभा मतदारसंघात जनतेच्या हितासाठी संघर्ष करणारे सुशिक्षित आणि सक्षम उमेदवार राजन क्षीरसागर यांना उभे केले आहे. क्षीरसागर यांनी गोदावरीचे पाणी मराठवाड्याला मिळवून दिले आहे, असेही ते म्हणाले.
यासाठी उभारलेल्या लढ्यात त्यांचा सिंहाचा वाटा असून पंतप्रधान पीक विमा घोटाळा हादेखील त्यांनी पुढे आणला. त्यातून शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळवून देण्यात पुढाकारही घेतला. नुकत्याच पाथरी येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनीदेखील परभणीतील शेतकऱ्यांवर पीक विमा योजनेत अन्याय झाल्याचे कबूल केले आहे. क्षीरसागर यांच्या आंदोलनानंतर या ठिकाणच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक विम्याची नुकसान भरपाई मिळाल्याचा दावादेखील त्यांनी केला.