परभणी - परभणीकरांना घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नाही. परभणीत आज आढळून आलेला तो कोरोनाबाधित युवक हिंगोली जिल्ह्याचा रहिवासी आहे. तसेच तो 13 एप्रिल रोजी पुणे येथून मोटरसायकलने हिंगोलीला जाण्यापूर्वी परभणीत आपल्या मेव्हण्यास भेटण्यासाठी आला होता, मात्र त्याच्या मेव्हण्याने त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने तो कुठल्याही स्थानिकाच्या संपर्कात आलेला नाही. त्यामुळे परभणीकरांसाठी ही एक समाधानाची बाब असून, त्याच्यापासून कोणालाही धोका नसल्याचे सांगण्यात येते.
परभणीत जिल्हा प्रशासन, पोलीस, वैद्यकीय अधिकारी, सफाई कर्मचाऱ्यांच्या आदींच्या प्रयत्नातून आतापर्यंत एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नव्हता. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात परभणीची स्तुती होत होती. पण आज परभणी शहरातील औद्योगिक वसाहतीच्या परिसरात पुण्याहून आलेला 21 वर्षीय तरुणाला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बाब पुढे आली आणि ग्रीन झोन मधला परभणी जिल्हा अचानक ऑरेंज झोनमध्ये गेला. महत्त्वाची बाब म्हणजे हा रुग्ण मूळचा परभणीतील रहिवासी नाही. तो हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथील रहिवासी आहे.
तो पुणे येथे कारागिरी कामानिमित्त वास्तव्याला होता. मात्र जवळा बाजार या आपल्या गावी जाण्यासाठी पुणे येथून निघाला होता. नगर, बीड मार्गे तो लपुन छपुन 13 एप्रिल रोजी परभणीत दाखल झाला. हिंगोली जाण्यापूर्वी त्याने परभणी शहरातील औद्योगिक वसाहतीच्या परिसरात राहणाऱ्या त्याच्या मेव्हण्याच्या घरी भेट दिली. मात्र पुणे येथून तो आल्याचे समजतात मेव्हण्याने त्याला तत्काळ परभणीच्या शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी नेले. त्याने दाखवलेल्या सतर्कतेमुळे त्याला जिल्हा रुग्णालयातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्याचा स्वॅबचा नमुना तत्काळ जिल्हा रुग्णालयातून औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला होता. त्यानुसार आज त्याचा अहवाल येऊन धडकला आणि परभणीत एकच गोंधळ उडाला.
दरम्यान, हा तरुण परभणीतील कोणाच्याही संपर्कात आलेला नाही, परभणीत येताच जिल्हा रुग्णालयात दाखल झालेला आहे. त्यामुळे परभणीकर यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.