परभणी - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राज्यात वाद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्याबाबत बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी 'समर्थ रामदास स्वामी यांचे एक वेगळे प्रभावी व्यक्तिमत्व होते. (Ashok Chavan Statment On Governor) छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कुठलेही नवे वाद निर्माण करायचे नाहीत अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. ते परभणीत बोलत होते.
परभणीत विकासकामांचे भूमिपूजन -
परभणी शहरातील 100 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाला. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात रविवारी रात्री 9 वाजे दरम्यान झालेल्या या कार्यक्रमास महापौर अनिता सोनकांबळे, खासदार फौजीया खान, आमदार सुरेश वरपुडकर, डॉ.राहुल पाटील, अमर राजूरकर, उपमहापौर भगवान वाघमारे, सुरेश देशमुख, तुकाराम रेंगे, सुरेश नागरे, बेटमोगरेकर, जिल्हाधिकारी आंचल गोयल, मनपा आयुक्त देविदास पवार, जि.प. सीईओ शिवानंद टाकसाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वादविवादामुळे आपण विकासात मागे -
मंत्री अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, मराठवाड्याच्या विकासाकरीता कुठेही निधीची कमतरता पडू देणार नाही. बऱ्याच वर्षानंतर सार्वजनीक बांधकाम विभाग मराठवाडा विभागाकडे आलेला आहे. यामुळे अधिक लक्ष देवून चांगल्या प्रतीचे आणि दर्जेदार काम वेळेवर होणे अपेक्षित आहे. आपली भूक विकासाची आहे. परंतू वादविवादामुळे आपण विकासामध्ये मागे पडत चाललो आहे.
परभणी जिल्ह्यात 'या' कामांना मंजुरी -
परभणी शहरामध्ये अनेक कामे सुरु झालेली आहेत. रस्तेच नव्हे, तर इमारतीमध्येसुध्दा वरिष्ठ जिल्हा न्यायालयासाठी 68 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. तर परभणी येथील उपविभागीय कार्यालयाकरीता 4 कोटी 75 लाख रुपये, सावली विश्रामगृहाकरीता 6 कोटी 52 लाख रुपये, सोनपेठ विश्रागृहाच्या भूसंपादनाकरीता 3 कोटी रुपये, बांधकाम विभागाच्या विभागीय कार्यालयाकरीता 7 कोटी 36 लाख रुपये, गंगाखेड उपविभागीय कार्यालयातंर्गत 2 कोटी 23 लाख रुपये, सोनपेठ कार्यालयातंर्गत 2 कोटी 63 लाख रुपये, परभणी सार्वजनीक बांधकाम विभागाचा परिसर सुधारणाकरीता 70 लाख रुपये, कर्मचारी निवासस्थानाकरीता 22 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
'नांदेडच्या बरोबरीने परभणीचा विकास'
चांगले रस्ते, इमारती करुन परभणीचा सर्वागिंण विकास करण्याची भूमिका आम्हा सर्वांची आहे. हा कार्यक्रम परभणीपूरता नाही. तर सेलूकरीता 50 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले असून, जिंतूरला देखील निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. यामुळे सर्वांनी अधिक लक्ष देवून चांगल्या प्रतीचे व दर्जेदार कामे वेळेत करणे आवश्यक आहे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूतळ्याचे सुशोभिकरण करत आहोत. या देशासाठी व महाराष्ट्रासाठी ज्या महापुरुषांनी योगदान दिले आहे, अशा महापूरुषांना वंदन करणे त्यांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे. मी आपणांस खात्री देवू इच्छितो की ज्याप्रमाणे नांदेड जिल्ह्याचा विकास सुरु आहे. त्याच्या बरोबरीने परभणी जिल्ह्याचा देखील विकास करण्याची मी याठिकाणी ग्वाही देतो, असे देखील अशोक चव्हाण म्हणाले.
बुलेट ट्रेन मराठवाड्यातून का नाही ?
मराठवाड्यातून मुंबईला जाण्याकरीता सुमारे बारा तास लागतात. बुलेट ट्रेन अहमदाबाद आणि नागपूरला जाऊ शकते तर मराठवाड्यातून का जाऊ शकत नाही ? हा माझा केंद्र सरकारला प्रश्न आहे. मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनीधीनी मिळून जर विचार केला, तर तीन ते साडेतीन तासात बुलेट ट्रेनने आपण हैद्राबाद ते मुंबईला पोहचू शकतो. मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळण्यासाठी रेल्वे हा महत्वाचा विषय आहे. मुख्यमंत्री यांच्या सहकार्याने नांदेड-परभणी-जालना समृध्दी महामार्गाकरीता 13 हजार कोटी मंजूर करण्यात आले असून याची भूसंपादनाची कार्यवाही देखील सुरु झालेली आहे. तसेच मराठवाड्याला हैद्राबाद आणि पुण्याला जोडण्याकरीता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला असल्याचेही मंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी म्हणाले.
हेही वाचा - Agitation OF Sambhaji Raje : छत्रपती संभाजी राजेंना चर्चेसाठी निमंत्रण; शिष्टमंडळ 'वर्षा'वर दाखल