परभणी - राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी आज (शनिवार) औरंगाबाद येथे रॅपिड अॅन्टीजन किटद्वारे तपासणी केली. गेल्या काही दिवसांत आमदार दुर्राणी यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून आता शोध घेतला जात आहे.
आमदार बाबाजानी दुर्राणी हे कोरोनाबाधित झालेले जिल्ह्यातील पहिलेच आमदार आहेत. यापूर्वी जिंतूर, मानवत आणि गंगाखेड येथील प्रत्येकी एका नगरसेवकाला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली होती. आमदार दुर्राणी यांनी आज औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात जाऊन तपासणी केली. या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रॅपिड अॅन्टीजन किटद्वारे प्राथमिक तपासणी केली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दीपक मुगळीकर यांनी देखील या बातमीला दुजोरा दिला आहे.
हा अहवाल जिल्हा प्रशासनाला समजताच पाथरी येथील आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे निवासस्थान आणि परिसरात निर्जंतुकीकरणाच्या कामाला सुरूवात करण्यात येत आहे. शिवाय त्यांच्या घरच्या लोकांना क्वारंटाइन करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. तसेच गेल्या काही दिवसांत आमदार दुर्राणी यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा आता प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे.