परभणी - जिल्ह्यातील सेलू तालुक्यात एका आठ वर्षीय बलिकेवर गावातीलच 25 वर्षांच्या तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी वैद्यकीय अहवाल आल्यानंतर शनिवारी सायंकाळी सेलू पोलिसांनी पॉक्सो कायद्या अंतर्गत तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी फरार असल्याने आरोपीच्या शोधात दोन पथके रवाना केली आहेत.
हेही वाचा... हिंगणघाटची पुनरावृत्ती : लासलगाव बस स्थानकात महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
सेलू पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे सेलू तालुक्यात गुरूवारी सायंकाळी संबंधीत गावातील अशोक भगवान बालटकर या २५ वर्षीय तरुणाने अंगणात खेळणाऱ्या आठ वर्षीय बालिकेला फूस लावून पळवून नेले. त्यानंतर पालकांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा अशोक हा बालिकेसोबत दिसल्याचे काही ग्रामस्थांनी पालकांना सांगितले. त्यामुळे पालिकांनी सेलू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार आरोपीविरोधात बालिकेला फूस लावून अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर शुक्रवारी सकाळी पालकांनी आरोपीच्या शेतात जावून शोध घेतला असता, बालिका त्या ठिकाणी सापडली. पालकांना पाहताच आरोपी अशोकने तेथून पळ काढला. बालिकेची पोलिसांनी विचारपूस करून वैद्यकीय तपासणीसाठी परभणीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. शनिवारी वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर आरोपी विरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तर आरोपीच्या शोधात दोन पथके रवाना केल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी दिली.