परभणी - परभणी ते परळी रेल्वे प्रवासादरम्यान पोखर्णी स्थानकावर रुळाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे या दरम्यान धावणारी आदिलाबाद-परळी आणि अकोला-परळी या दोन्ही सवारी (पॅसेंजर) गाड्या २२ मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. या दोन्ही गाड्या आता परभणीपर्यंत धावतील, अशी माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
परभणी ते परळी सेक्शन मधील गंगाखेड ते पोखर्णी (नृसिंह) रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाच्या दुरुस्ती करीता सकाळी ९:४५ ते दुपारी १३:४५ दरम्यान रोज ४ तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक ६ जानेवारी ते २२ मार्च दरम्यान ७७ दिवसांचा असेल. यामुळे याचा २ गाड्यांवर परिणाम होईल. यामध्ये (गाडी संख्या ५७५५४) आदिलाबाद ते परळी ही सवारी गाडी परभणीपर्यंतच धावेल. म्हणजेच ही गाडी परभणी ते परळी दरम्यान ६ जानेवारी ते २२ मार्च दरम्यान रद्द असेल.
हेही वाचा - शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका सोडलीये...
तसेच (गाडी संख्या ५७५४०) परळी ते अकोला ही सवारी गाडी ६ जानेवारी ते २२ मार्च दरम्यान परळी ते परभणी दरम्यान रद्द असेल. ही गाडी या तारखांदरम्यान परभणी ते अकोला अशी धावेल. तर, परतीच्या वेळेस परळी ऐवजी परभणी येथून सुटेल. हा ब्लॉक तब्बल ७७ दिवस असणार असून प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागणार आहे. तर, प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
हेही वाचा - पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपी फरार, परभणीच्या पाथरीतील घटना