परभणी - जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघात बहुरंगी लढत असल्याने काट्याची टक्कर दिसून येत आहे, तर अशीच परिस्थिती जिंतूरात असून येथे बोर्डीकर-भांबळे यांच्या पारंपारिक लढत होत आहे; परंतु परभणीसह पाथरी मतदार संघात मात्र महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असे असले तरी, आज (गुरुवार) मतमोजणीनंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे.
सकाळी आठ वाजल्यापासूनच मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. पहिल्या दोन ते तीन तासातच मतदारसंघांमधील चित्र स्पष्ट होईल; परंतु तत्पूर्वी विविध सर्वे आणि जनमत चाचण्यांमधून उमेदवारांच्या विजयाचे आणि पराभव अंदाज व्यक्त होऊ लागले आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने अंदाज बांधत आहे.
"परभणी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढत"
याठिकाणी शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. राहुल पाटील यांची काँग्रेसचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार सुरेश नागरे यांच्याशी प्रमुख लढत होत आहे. तसेच प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेसचे रविराज देशमुख आणि एमआयएमचे अली खान यांच्याकडेही पाहिले जात आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोहम्मद झैनदेखील रिंगणात आहेत. परंतू मागच्या विधानसभेला (2014) परभणी मतदारसंघातून आमदार डॉ.राहुल पाटील यांनी 'एमआयएम'चे सज्जू लाला यांच्यावर 27 हजार मतांनी विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांच्या विरोधात भाजपचे आनंद भरोसे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांनी 40 हजारांहून अधिक मते मिळवली होती. मात्र यावेळी युती असल्याने भाजपचे आनंद भरोसे हे आमदार डॉ.राहुल पाटील यांच्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता व्यक्त होत आहे.
"पाथरी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढत"
पाथरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार मोहन फड यांचा सामना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा उमेदवार सुरेश वरपूडकर यांच्याशी होत आहे. मागच्यावेळी (2014) देखील या दोघांमध्येच काट्याची टक्कर होऊन अवघ्या दोन हजारांच्या फरकाने मोहन फड यांनी विजय मिळवला होता. यावेळीही या दोघांमध्येच पुन्हा सामना रंगत आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीचे विलास बाबर आणि शिवसेनेचे बंडखोर डॉ. जगदीश शिंदे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोघांचा प्रभाव मोहन फड आणि सुरेश वरपूडकर या दोघांवरही पडणार आहे. परंतू याचा फटका सुरेश वरपूडकर यांना बसण्याची चर्चा आहे, त्यामुळे मोहन फड यांच्या विजयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परंतू प्रत्यक्षात त्यांचा फटका नेमका कोणाला बसतो, हे सांगणे अवघड आहे.
"जिंतूर विधानसभा मतदार संघातील प्रमुख लढत"
जिंतूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजय भांबळे विरुद्ध तत्कालीन काँग्रेसचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यात पारंपारिक लढत गेल्या अनेक वर्षांपासून होत आली आहे. ती यंदाही पाहायला मिळते. मात्र यावेळी आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध भाजपावासी झालेल्या रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर या रिंगणात आहेत. मागच्यावेळी (2014) रामप्रसाद बोर्डीकर यांना मोठ्या फरकाने विजय भांबळे यांनी पराभूत केले होते. यावेळी मात्र बोर्डीकर कुटुंबीय मागचा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण तयारीनिशी उतरले आहे; परंतु याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे मनोहर वाकळे आणि शिवसेनेचे बंडखोर राम खराबे या उमेदवारांचा भांबळे आणि बोर्डीकर यांना समान फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणची लढत काट्याची असल्याचे बोलले जाते.
"गंगाखेड विधानसभेत बहुरंगी लढत"
गंगाखेड विधानसभा हा मतदार संघ पैसेवाल्या उमेदवारांचा मतदारसंघ म्हणून गेल्या वीस वर्षांपासून प्रसिद्ध आहे. याठिकाणी विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्याविरुद्ध मैदानात शिवसेनेचे विशाल कदम, रासपचे रत्नाकर गुट्टे हे दोन प्रमुख उमेदवार आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीच्या करुणा कुंडगीर याही प्रमुख दावेदार मानल्या जातात. दरम्यान, मधुसूदन केंद्रे यांच्या बद्दल गेल्या पाच वर्षात असलेल्या नाराजीमुळे ते यावेळी प्रमुख लढतीतून मागे पडले आहेत. तसेच माजी आमदार सिताराम घनदाट हे देखील अपक्ष म्हणून रिंगणात उतरले असून त्यांचाही या वेळी फारसा प्रभाव दिसून येत नाही. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेचे विशाल कदम, 'रासप'चे रत्नाकर गुट्टे आणि 'वंचित'च्या करूणा कुंडगीर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. मागच्या वेळी (2014) गंगाखेड विधानसभा मतदारसंघात रासपचे रत्नाकर गुट्टे विरुद्ध आमदार मधुसूदन केंद्रे अशी लढत झाली होती. यामध्ये राष्ट्रवादीचे मधुसूदन केंद्रे यांनी केवळ दीड हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.
हेही वाचा : परभणीत यंदा कोणाकडे असेल मतदारांचा कौल ?