परभणी - परभणीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहिले. यानंतर स्टेडियम मैदानावर त्यांची जाहीर सभादेखील झाली. मात्र, यावेळी काँग्रेसचा एकही वरीष्ठ पदाधिकारी उपस्थित नसल्याने आघाडीतील एकोप्याच्या भावनेवर संशय व्यक्त केला जात आहे.
या संदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार बाबजानी दुराणी म्हणाले, की मंगळवारी परभणीत आघाडीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यासाठी स्वतः शरद पवार, छत्रपती उदयनराजे भोसले आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहिले. दरम्यान, या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना निमंत्रण देण्यात आले. परंतु, त्यांना वेळ असेल तर ते येतील, असे त्यांनी सांगितले. याशिवाय काँग्रेसचा इतर एकही नेता उपस्थित राहिला नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
दरम्यान, अर्ज दाखल करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहरातून मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली. अर्ज दाखल झाल्यानंतर दुपारी ३ वाजता सभा झाली. तर यावेळी आघाडीच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या अनुपस्थितवरून पत्रकारांनी प्रश्न विचारताच दोन्ही काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख हे जोरात काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ते यावेळी उपस्थित नव्हते, हे विशेष. या प्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी खासदार गणेशराव दुधगावकर हे देखील अनुपस्थित होते. तेव्हा आपण त्यांच्या मुलाच्या भाजप प्रवेशाचे ऐकले आहे, ते मात्र अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत असे सांगण्यात आले.
'वंचित नव्हे किंचित आघाडी'
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार मारक ठरणार आहे. परंतु, असे असले तरी, किंचित लोकांची ही वंचित आघाडी असल्याचा टोला मारून दुराणी यांनी त्यांचा आम्हाला काहीच फरक पडणार नसल्याचा दावा केला.